
गणेशोत्सवात महाप्रसाद तयार करण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर सक्तीचा
ठाणे, प्रतिनिधी: आगामी गणेशोत्सव तसेच इतर सार्वजनिक उत्सवांच्या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भोजनासाठी आता केवळ व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक असणार आहे. सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलेंडरचा होणारा गैरवापर थांबवण्यासाठी आणि संभाव्य भीषण आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिललदारांना यासंबंधीचे आवश्यक सूचना दिल्या आहेत.
अनेक सार्वजनिक गणेश मंडळे अज्ञानापोटी किंवा दुर्लक्षामुळे महाप्रसादाचा स्वयंपाक करताना सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर करतात. मात्र, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या क्षमतेत, बर्नरमध्ये आणि गॅसच्या प्रेशरमध्ये मोठा फरक असतो. मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवताना घरगुती सिलेंडरचा वापर केल्यास स्फोट होऊन मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होतो. अशा दुर्घटनेत घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर आढळल्यास विम्याचे संरक्षणही नाकारले जाते. शिवाय, सार्वजनिक कामांसाठी घरगुती सिलेंडर वापरणे हा ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’नुसार गंभीर गुन्हा असून अपघात घडल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात; तसेच यामुळे शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होते.
या सर्व गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. आता महापालिका, पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभागामार्फत गणेश मंडळांना मंडप, ध्वनी किंवा महाप्रसादाची परवानगी देताना ‘केवळ व्यावसायिक सिलेंडर वापरणे बंधनकारक राहील’ ही अट अधिकृत परवानगी पत्रातच स्पष्ट नमूद केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांनी संयुक्त परिपत्रक काढून मंडळांना याबाबत पूर्वकल्पना द्यावी आणि तहसिलदारांनी आपल्या तालुक्यातील मंडळांना सूचित करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करताना ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके (संपर्क क्र. 77220 31471) यांनी “श्रीगणेशोत्सव हा आपला अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे, पण महाप्रसाद तयार करताना सुरक्षेशी अजिबात तडजोड केली जाऊ नये. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या क्षमता तसेच बर्नरच्या प्रेशरमध्ये जमीन-आस्मानचा फरक असतो. महाप्रसादाच्या मोठ्या भांड्यांसाठी घरगुती सिलेंडर वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. जिल्हा प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन हा कडक निर्णय लागू केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. बाप्पाचा हा उत्सव प्रत्येकासाठी सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी सर्व गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करत केवळ व्यावसायिक सिलेंडरचाच वापर करावा.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
00000000000



