आदर्श जीवनशैली, पौषक आहार, औषधी हीच क्षयरोग मुक्तीची त्रिसुत्री – आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड
लातूर, प्रतिनिधी: सध्या भारतात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकरने क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी क्षयरोगाचे उच्चाटनाचे नियोजन केलेले आहे. या अनुषंगाने 1 जानेवारी, 2026 रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीस लातूर परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी निक्षयमित्र बनून 55 क्षयरुग्णांना दत्तक घेवून त्यांच्या पोषणाची जबाबदारी घेतली.
तसेच आहार किट देण्यासाठी परिमंडळातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व विभाग प्रमुख यांनी स्वतः निक्षय मित्र बनून प्रत्येकी 20 ते 50 पोषण आहार किटचे वितरण करावे. जेणेकरून एकही रुग्ण पोषक आहारासाठी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पोषण आहार किटमधील घटकाचे आरोग्यासाठी उपयोग, हे सागून आदर्श जीवनशैलीचे कशी असावी, प्रथिनयुक्त पोषण आहार, पुर्ण औषणी कोर्स व व्यसनांपासून मुक्त राहणे या माध्यमातून क्षयरोगमुक्ती मिळवता येते, असे आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी सांगितले.
उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांचा जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने सेंट्रल क्षेयरोग विभागाकडून प्राप्त प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 1 हजार 953 क्षयरुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 470 रुग्णांना पोषण आहार किट पुरविले आहेत. अद्याप 1 हजार 484 क्षयरुगण प्रतिक्षेत आहेत. अधिकारी, कर्मचारी तसेच खाजगी संस्था, लोकप्रतिनिधी, उद्योजक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी, सीएसआरच्या माध्यमातून जास्तीत जास्त निक्षय मित्र बनवून पोषण आहार आहार किट देण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास पुणे येथील सेवानिवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ. गायकवाड, लातूर येथील सहाय्यक संचालक डॉ. संजय ढगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, एडीएचएस कुष्ठरोग विभागाचे डॉ. ताबांळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सावंत, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, औसाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवणीकर, रेणापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेड्डी, तसेच उपसंचालक आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.