vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नाशिक, प्रतिनिधी : लोककवी वामनदादा कर्डक हे केवळ कवी नव्हते, तर ते समाजजागृती करणारे प्रभावी विचारवंत होते. त्यांनी आपल्या काव्य आणि गीतांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार केला. त्यांच्या गीतांनी समाजात आत्मविश्वास निर्माण करीत सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आज सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार राजाभाऊ वाजे, माजीमंत्री आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंढे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, लोककवी वामनदादा कर्डक यांचे कुटुंबीय, माजी महापौर पुणे विराज जैन, सरपंच उज्वला बारके, माजी सरपंच दत्ता डोमाडे यांच्यासह अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या काव्यातून समाजातील वंचित, पीडित घटकांच्या वेदना आणि समतेचा संदेश प्रभावीपणे मांडला गेला, वामनदादा कर्डक यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या जन्मगावी उभारण्यात येणारे स्मारक पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल. या स्मारकाच्या माध्यमातून वामनदादा यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देत महाड येथे चवदार तळे सत्याग्रह करून समानतेचा लढा उभारला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय संविधानाने सर्व धर्म, जाती आणि समाजघटकांना समान न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केली असल्याचे राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.लोककवी वामनदादा कर्डक यांचे साहित्य, विचार व कार्य समाजासाठी प्रेरणादायी : मंत्री छगन भुजबळ

लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या शाहिरी, गीतांमधून आणि लेखणीतून बहुजन समाजात आत्मसन्मान व सामाजिक जागृतीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या विचारांचे स्मरण पुढील पिढ्यांपर्यंत राहावे आणि समाजप्रबोधनाची परंपरा अधिक बळकट व्हावी, यासाठी देशवंडी येथे भव्य स्मारक उभारण्यात येत असून हे स्मारक समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, १५ ऑगस्ट १९२२ रोजी देशवंडी येथे जन्मलेले वामनदादा कर्डक हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनकार होते. शिक्षणाचा गंध नसतानाही त्यांनी बाराखडी व जोडाक्षरे शिकून साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या आयुष्यातील गरीबी, अन्याय आणि विषमता अनुभवली आणि त्याच अनुभवातून समाजातील वंचित घटकांच्या वेदना आपल्या शाहिरीतून मांडल्या. वामनदादा कर्डक यांनी दहा हजारांहून अधिक गीते लिहिली असून त्यांच्या गीतांमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्या शाहिरीने आंबेडकरी चळवळीला सांस्कृतिक बळ दिले आणि समाजातील लाखो लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला असल्याचे त्यांनी सांग

ले.स्मारकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्याचा प्रयत्न करणार – मंत्री दादाजी भुसे

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या शायरीतून सामाजिक परिवर्तनाचा संदेश मिळतो. त्यांच्या काव्यातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मारकाच्या उभारणीमुळे नव्या पिढीला त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय होईल. स्मारक उभारताना परिसरात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आणि प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशा सुविधा उपयुक्त ठरतील. असे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

देशवंडी येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण उपलब्ध असून गावाची तयारी व विद्यार्थ्यांची पटसंख्या असल्यास पुढील इयत्तांचे वर्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.जन्मभूमीत उभे राहणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक वैचारिक दीपस्तंभ : मंत्री संजय शिरसाट

लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या काव्य आणि गीतांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविले. त्यांच्या गीतांनी समाजात स्वाभिमान, समता आणि परिवर्तनाची जाणीव निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत उभारले जाणारे हे स्मारक केवळ एक वास्तू न राहता, सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.

मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, वामनदादांनी आपल्या साहित्य व गीतांच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित घटकांना जागृत करण्याचे महान कार्य केले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात येणारे हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा संदेश दिला. त्याच विचारातून प्रेरणा घेऊन या स्मारक परिसरात अभ्यासिका, ग्रंथालय आणि शैक्षणिक सुविधा उभारण्यात येतील. जेणेकरून समाजातील युवकांना शिक्षणाची प्रेरणा मिळेल आणि त्यांना अभ्यासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध होईल. लोककवी वामनदादा कर्डक यांचे कार्य हे सामाजिक चळवळीचे महत्त्वपूर्ण अंग असून त्यांच्या गीतांमधून अनेक पिढ्यांमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारले जाणारे स्मारक समाजाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही मंत्री श्री. शिरसाट यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार राजाभाऊ वाजे व आमदार माणिकाराव कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंढे यांनी प्रास्ताविकातून कवी वामनदादा कर्डक यांच्या कार्याची महती अधोरेखित केली. कार्यक्रमात मालेगावची कन्या प्रेरणा खवळे यांचा स्पर्धा परिक्षेतील योगदानाबद्दल व प्रसाद दिघोळे यांचा तिसऱ्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत कब्बडी स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक मिळविल्याबाबत सत्कार करण्यात आला. तसेच लोककवी वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांचा व जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सहायक आयुक्त श्री नांदगांवकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करून भूमीपूजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुमारे १३ कोटी ६७ लाख रुपये खर्च करून हे स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकासाठी एकूण २१ एकर जागा उपलब्ध झाली असून त्यापैकी ५६ गुंठे जागेवर मुख्य वास्तूचे बांधकाम करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं63व्या वर्षी निधन…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

🌧️ रायगड जिल्हा तालुकानिहाय पर्जन्यमान🗓️ दिनांक: 01.07.2025 (आज 8 वाजेपर्यंत)

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांच्या जीवनात जातीच्या दाखल्यांमुळे सकारात्मक परिवर्तन – अप्पर मुख्य सचिव विकास खारगे- भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण – पाणंद रस्ते खुले केल्याबद्दल शिष्टमंडळाने व्यक्त केली कृतज्ञता..

vishwatmaklokswamivarta

मुंब्रा विधानसभा चे आमदार: जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर…

vishwatmaklokswamivarta