vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विशेष लेख -यशवंतराव चव्हाण- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

विशेष लेख -यशवंतराव चव्हाण- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

विशेष प्रतिनिधी-  लोकशाहीचे पुरस्कर्ते, संस्कारक्षम राजनेता, चारित्र्यसंपन्न समाजसेवक,कुशल प्रशासक,थोर देशभक्त,ओजस्वी वक्ता, प्रतिभाशाली लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले यशवंतराव म्हणजे त्याग,सेवा व समर्पणवृत्तीचं मूर्तिमंत प्रतिक होय. महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळ मध्ये भाग घेऊन त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा पुकारला.इतकेच नव्हे तर, १९४० मध्ये पुण्यातील येरवडा कारागृहात तुरुंगवासही भोगला.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढलेल्या स्वातंत्र्य लढ्यास अखेर यश लाभून,१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली.या स्वातंत्र्य संग्रामात यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसेनानींनी मोठं योगदान दिलं,तर काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्याची परिणिती म्हणजे इंग्रजांच्या १५० वर्षांच्या जुलुमी सत्तेचा अंत होऊन,भारत स्वतंत्र झाला.

       एवढं करून यशवंतराव थांबले नाहीत.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून विभक्त करण्याचा दुष्ट डाव हाणून पाडला.त्यातून १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ झाली.याला त्यांनी सोनियाचा दिवस ही उपमा दिली.तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली.आणि यशवंतराव चव्हाण यांना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला.याप्रसंगी आपल्या भाषणात चव्हाणसाहेब म्हणाले,लोक कोणत्या भागात रहात आहेत,त्यांची भाषा काय,त्यांचा धर्म कोणता या विचारांना थारा न देता,सर्व जाती-धर्मातील लोकांना समान न्याय,समान संधी देणे,ही सरकारची मुख्य भूमिका राहील.महाराष्ट्रीय माणूस हा केवळ मराठी बोलणारा नव्हे,तर जो महाराष्ट्रात राहतो आणि राज्याच्या विकासात सहभागी होतो,असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय आहे. वास्तवात यशवंतराव हे सर्व जाती-धर्म-भाषेच्या लोकांकडे समानतेच्या भावनेतून पाहणारे लोकनेते होते,हे यावरून दृष्टोत्पत्तीस येते.

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे बळवंतराव चव्हाण यांच्या शेतकरी कुटुंबात झाला.त्यांच्या आईचे नाव विठाबाई उर्फ विठाई.आई हे यशवंतरावांचे परम दैवत.जिवापेक्षा मोलाचा ठेवा म्हणून त्यांना आई विठाई होती.वडिलांच्या पश्चात मायमाउली विठाईने त्यांना संस्कारांचं बाळकडू देऊन कर्तृत्ववान यशवंताला घडविलं.तर यशवंतरावांच्या सुविद्य पत्नी वेणूताईनींही त्यांना जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोलाची साथ दिली.त्यांनी कराड येथे प्राथमिक शिक्षण घेतले,तर पुणे/सातारा येथे बी.ए.,एल.एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या.

        चव्हाणसाहेबांच्या कारकीर्दीत शेतीचे आधुनिकीकरण,औद्योगिकीकरण,जमीन सुधारणा,जलसंपत्तीचे सुयोग्य नियोजन,पंचायत राजची उभारणी,भूमिहीनांना जमीन वितरण,सत्तेचे विकेंद्रीकरण,कसेल त्याची जमीन कायदा,सहकार चळवळीचे बळकटीकरण,शिखर बँक व सहकारी बँकांची निर्मिती,सहकारी साखर कारखाने,सूत गिरण्यांची उभारणी,मागास व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोफत शिक्षण,मराठवाडा विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठाची स्थापना,सातारा सैनिकी स्कूलची निर्मिती,विविध साहित्य संस्कृती मंडळांची निर्मिती,महार वतन कायदा रद्द,कोयना धरणावर वीजनिर्मिती केंद्राची उभारणी,आदिवासी मुलामुलींसाठी आश्रमशाळा असे विभिन्न लोकोपयोगी निर्णय घेऊन त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.या सर्व महत्वाकांक्षी निर्णयांतून यशवंतरावांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते.

        यशवंतरावांनी आपल्या राजकीय जीवनात उपपंतप्रधान,संरक्षण मंत्री,गृह मंत्री,परराष्ट्र मंत्री,केंद्रीय अर्थ मंत्री आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ही पदे भूषवून राज्यासह देशासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.अशाप्रकारे त्यांनी समतोल,पारदर्शक व विकासाभिमुख राजकारणाचा वारसा महा..राष्ट्राला दिला.     शेतीचे महत्व विषद करतांना यशवंतराव म्हणायचे,”आपली भरभराट ही शेवटी शेतीवरच अवलंबून आहे.इतकेच नव्हे तर,आपले औद्योकीकरण देखील कृषी विकासावर अवलंबून आहे.आपल्या देशाच्या आर्थिक उन्नतीत शेती केंद्रस्थानी आहे.उत्पादनाचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंबिले पाहिजे.शेतीविषयक शास्त्रीय दृष्टिकोन बाळगला पाहिजे.शेती व उद्योगधंदे यांच्या विकासावर आधारित अर्थव्यवस्था उभारून आधुनिक व पुरोगामी राज्य निर्मितीचा मंत्र चव्हाणसाहेबांनी राज्याला दिला,त्यामुळे महा..राष्ट्र हे नेहमी देशाचे पथदर्शक राज्य ठरले आहे.म्हणतात ना,”ज्या ज्या वेळी हिमालय संकटात आला,त्या त्या प्रसंगी संह्याद्रीने त्याला मदतीचा हात दिला”.      यशवंतरावांमध्ये प्रतिभाशाली लेखकाचे गुण होते.राजकारण व साहित्य यांच्यात समन्वय साधणारे यशवंतराव हे एक असामान्य अन् प्रतिभावंत नेते होते.सह्याद्रीचे वारे हा भाषणसंग्रह,स्वातंत्र्याची हाक बुलेटिन, ऋणानुबंध, युगांतर, भूमिका हा ग्रंथांमधून त्यांच्या साहित्य पैलूंचे दर्शन घडते.त्याचप्रमाणे कृष्णाकाठ हे आत्मकथन त्यांच्या जीवनाच्या जडणघडणीवर प्रकाश टाकते.साहित्य हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते.त्यांनी संग्रहित केलेले १० हजारांहून अधिक ग्रंथ आजही जनतेसाठी कराड येथील वेणूताई स्मारक ग्रंथालयात उपलब्ध आहेत.”राष्ट्राने मला काय दिले याचा विचार न करता,मी राष्ट्राला काय देऊ शकतो” या समर्पित भावनेतून प्रत्येकाने आपले जीवन मार्गक्रमित करावे,असा मोलाचा सल्ला त्यांनी राज्यातील सर्वधर्मीय जनमानसाला दिला.

  जे जे आपणा ठायी..ते ते दुसऱ्यास सांगावे!शहाणे करुनि सोडावे..सकळ जन!! या उक्तीला साजेसं कार्य चव्हाणसाहेबांनी आयुष्यभर केलं. सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे,हे त्यांचे जीवन ध्येय होते.यशवंतरावांच्या स्वप्नातील आधुनिक महाराष्ट्राला अधिकाधिक सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रत्येकाने तनमनधनाने योगदान द्यावे, म्हणजे यशवंतरावांची जयंती साजरी करणे खऱ्या अर्थाने सार्थक होऊन त्यांना ही खरी मानवंदना ठरेल.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार“जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट, महाविकास आघाडीतील  20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा दावा .

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तर :सौर कृषी पंपांकरिता लाभार्थी शेतकऱ्यांवरील भार वाढवलेला नाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सामाजिक जाणीव जागृती

vishwatmaklokswamivarta

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती

vishwatmaklokswamivarta