
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी…
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. “मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. “या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे.प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बस आणि हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, “मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.”सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने हा एक विशेष योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला ॲक्सेस कंट्रोल मार्ग ठरला होता. या मार्गामुळे आयटी, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली. आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे.तसेच या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल. यासाठीच या प्रकल्पातील बोगद्यांना देखील गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतीकृतीप्रमाणे सजवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. कामाचा दर्जा उत्तम ठेवून ही शिल्प खराब होऊ नयेत याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.
“अशा प्रकारचे प्रकल्प हे केवळ रस्ते नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे असतात. कनेक्टिव्हिटी मजबूत असेल तर उद्योग, आयटी, सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात,” असे शिंदे यांनी सांगितले.
पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड, वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडून राज्यात ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी सक्षम दळणवळण व्यवस्था उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून हा प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारा ठरणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.
……



