असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा…
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा…
राज्य प्रतिनिधी-देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज( एआययू )च्या १०० व्या वार्षिक महासभेचे व “ज्ञान आणि नवोपक्रमातून स्वावलंबी भारत घडवणे” या विषयावर पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला एआययूचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनय कुमार पाठक, महासचिव डॉ. पंकज मित्तल, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे , प्र-कुलगुरू डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, विद्यापीठांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर प्रगती करताना दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. उच्च शिक्षण संस्थांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे युवक घडवावेत. कौशल्य विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक शिक्षण पद्धती उभारण्याचे आवाहनही राज्यपालांनी केलेउच्च शिक्षणासाठी ५० टक्के प्रवेश प्रमाण गाठण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पर्यावरणपूरक विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रगत तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश यावरही श्री.वर्मा यांनी भर दिला.
एआययूची शताब्दी परंपरा अधोरेखित करताना राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, ही संघटना उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची मार्गदर्शक संस्था असून देशातील विद्यापीठांना धोरणात्मक दिशा देत आहे. डॉ. एस. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांसारख्या दिग्गजांनी घडविलेला शैक्षणिक वारसा आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. विनय कुमार पाठक म्हणाले, आज भारत ‘ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून त्याची पायाभरणी विद्यापीठांमधूनच होत आहे. देशाची अर्थव्यवस्था सशक्त असून जागतिक आव्हानांवर मात करत विकासदर सातत्याने उंचावलेला आहे. नवउद्योग, संशोधन आणि पेटंट नोंदणीमध्ये वाढ होत असून मोठ्या शहरांसोबतच लहान शहरांतूनही प्रगतीची नवी केंद्रे निर्माण होत आहेत. विद्यापीठांनी संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता यांना चालना देऊन ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. श्री.पाठक यांनी भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील शताब्दी प्रवासाचा आढावा घेतला.
कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, शिक्षणाचा अंतिम उद्देश समाजसेवा हाच असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यावर भर दिला जात आहे. संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि समाजाभिमुख उपक्रमांमधून उत्कृष्टतेचा ध्यास घेत विद्यापीठ कार्यरत आहे. जागतिक सहकार्य आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
महासचिव डॉ. पंकज मित्तल यांनी संघटनेच्या कार्याचा विस्तार स्पष्ट करताना शिक्षण अधिक सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधन भागीदारी आणि विद्यार्थी देवाण-घेवाण यामुळे भारतीय शिक्षणाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात “ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन”, एआययूच्या १०० वर्षांच्या स्मरणिकेचे तसेच “इंडियन युनिव्हर्सिटी जर्नल” चे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले