vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावा, कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश – नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना 

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावा, कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश – नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना

 

 सांगली, प्रतिनिधी जिल्ह्यात मान्सून कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूरस्थितीत तसेच, एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने टंचाईस्थितीच्या पार्श्वभूमिवर संबंधित सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याची तयारी ठेवावी. जीवित व वित्तहानी टाळून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत मान्सूनपूर्व तयारी आणि एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने टंचाईस्थिती अशा दोन्ही परिस्थितीत यंत्रणांच्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी संभाव्य पूरस्थिती आणि एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थिती अशा दोन्ही बाबींचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध यंत्रणाचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, महसूल उपविभागीय अधिकारी व अन्य संबंधित यंत्रणांचे क्षेत्रीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 व 2021 चा पूर्वानुभव लक्षात घेऊन संभाव्य पूरपरिस्थितीत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढवावी. धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात. दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण करावे. जास्त पर्जन्यमान असणाऱ्या कालावधीत दैनंदिन मॉनिटरिंग करावे. आलमट्टी धरण प्रशासनाशी नियमित समन्वय ठेवावा. संभाव्य पूरबाधित गावांचे रेकॉर्ड जतन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. पाणी योजना वीजदेयक भरण्याअभावी खंडित होतात, या पार्श्वभूमिवर मोठ्या गावांच्या पाणी योजना सौरउर्जेवर करण्यासाठी प्रयत्न करावेत. धोकादायक शाळा, इमारतींचे ऑडिट करावे. अतिधोकादायक इमारती निर्लेखित कराव्यात. नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यासाठी ग्रामस्तरावर नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवावी. महापालिका क्षेत्रात पुरामुळे नियमित बाधित होणाऱ्या क्षेत्रात संरक्षक भिंत बांधावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरप्रवण गावांची अद्ययावत यादी, नदी पातळीतील बदलाबाबत नागरिकांना तात्काळ माहिती देण्यासाठी अलर्ट प्रणाली, तसेच आपत्कालिन परिस्थितीसाठी बचाव साहित्य सज्ज ठेवावे. निवारा केंद्रांमध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता व आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. जलसंपदा, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडावी. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावा. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, यासाठी जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

यंदाच्या एल निनोच्या स्थितीमुळे मान्सूनवर अनिष्ट परिणाम होऊन पावसाचे प्रमाण घटण्याची व असमान वितरणाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशा स्थितीत शेती, जलसाठे, भूजलपातळी आदिंवर विपरित परिणाम होतो. एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून, संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयाने मानव व जनावरे यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलसंधारणाच्या उपायांवर भर द्यावा. संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक प्रतिबंधात्मक व आपत्कालिन उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. उपलब्ध पाणी, चारा, खते याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. संभाव्य टंचाईस्थितीवर मात करण्यासाठी कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी राखीव पाण्यात कपात करून 5 टीएमसी पाणी सिंचनासाठी वळवण्याच्या अनुषंगाने बैठक घेण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थिती आणि एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने टंचाईस्थिती अशा दोन्ही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून कोणतीही आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा विभाग, महापालिका, जिल्हा परिषद यांच्यासह अन्य विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

महापालिकेचा आढावा सादर करताना महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी पूर्वीच्या महापूर कालावधीत पार पाडण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण कामे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र – वॉर रूम, वायरलेस संदेशवहन यंत्रणा (वाकी -टॉकी), तक्रार नोंदणी व निवारणकामी संदेश यंत्रणा, आपत्ती मित्र ॲप, ड्रोन सर्वेक्षणाचे अचूक पाणी पातळीचे नकाशे, मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष जबाबदारी, पाणी पुरवठा विभाग, जलनि:सारण विभाग, आरोग्य विभाग, उद्यान विभाग, धोकादायक इमारतींचा अहवाल, अग्निशमन व आणिबाणी सेवा विभाग, महापालिका क्षेत्रातील पूरपट्ट्यामधील नागरिकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण, आपत्ती कालावधीसाठी उपलब्ध इतर महत्वाच्या सुविधा आदींबाबत महापालिकेचा आढावा सादर केला.आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हा प्रशासनाचा आढावा सादर करताना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी उपलब्ध बोट साहित्य, जिल्हा नियोजन समिती मार्फत खरेदी केलेल्या बोटींचे वाटप, साहित्य सामग्री, आपत्कालिन साहित्य, एनडीआरएफ पथक उपलब्धता, दरडग्रस्त गावे उपाययोजना, तात्पुरते निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन अनुषंगिक कामकाज, एल निनो चा प्रभाव त्यावर करावयाच्या उपाययोजना आदिंबाबत सविस्तर माहिती सादर केली.

पूरनियंत्रण संबंधी जलसंपदा विभागाचा आढावा सादर करताना अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी महापूर कालावधीतील महत्तम पाणी पातळी व विसर्ग, सन 2019 व 2021 च्या महापुरास सामोरे जाताना विभागाने केलेले कामकाज, सन 2019 व 2021 मधील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा तपशील, पूर परिस्थिती पूर्वतयारी अनुषंगाने करण्यात आलेले नियोजन, टंचाईस्थितीत सन 2026 करिता कोयना व वारणा धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन आदिंबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या सज्जतेचा आढावा सादर करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी पूरबाधित गावे, उपलब्ध साहित्य, धोकादायक घरांची माहिती, जिल्ह्यातील पशुधन संख्या, ग्रामपंचायत, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, पाणी व स्वच्छता, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, कृषी, लघु पाटबंधारे, महिला व बालकल्याण आदिंबाबत माहिती दिली.

प्रारंभी उपस्थित सर्वांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली. बैठकीस आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी**अर्ज करण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन*

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची  राज्य सरकारची तयारी- उपमुख्यमंत्री अजित पवार

पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन**महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप*