मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन
लातूर, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण २०२६ कार्यक्रमाच्या अनुषंगाने २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांची बैठक नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील डी. पी. सी. हॉल येथे झाली. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लातूरच्या नायब तहसीलदार (निवडणूक) श्रीमती अर्चना मैंदर्गी उपस्थित होत्या.
बैठकीमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण–२०२६ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून राबविण्यात येणारी घरभेट मोहीम, आणि बीएलए-1 व बीएलए-2 यांची भूमिका व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन केले. बैठकीच्या अंतिम टप्प्यात उपस्थित प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध शंकांचे प्रशासनाकडून योग्य निरसन करण्यात आले. सर्व प्रतिनिधींनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण–२०२६ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.-=