
वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या देशभरातील अनेक टोळ्या डीआरआयने आणल्या उघडकीस.
.देशभरात संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 440 हून अधिक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले किंवा संरक्षित वन्यजीव तसेच सुमारे 15 किलो हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत जप्त; 33 जणांना अटक
राज्य प्रतिनिधी –
बेकायदेशीर वन्यजीव तस्करीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) देशभरात एका पाठोपाठ केलेल्या समन्वित कारवाईमधून 440 धोक्यात असलेले किंवा संरक्षित वन्यजीव, तसेच सुमारे 15 किलो वजनाच्या हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत हस्तगत करण्यात आले असून या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या 33 जणांना अटक करण्यात आली आहे.दिनांक 10.07.26 रोजी, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी राजस्थानमधील सुजानगडजवळ हस्तिदंताचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 11 किलो हस्तिदंत जप्त करण्यात आले. चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना त्यांच्याकडून जप्त केलेल्या हस्तिदंतासह वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अन्वये पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात सोपविण्यात आले.
यापूर्वी, हावडा येथे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन हस्तिदंतापासून बनवलेल्या देवतांच्या दोन मूर्ती हस्तगत केल्या; या मूर्ती बांगलादेशातून तस्करी करून भारतात आणल्याचा संशय आहे.
कर्नाटकातील म्हैसूर येथे राबवलेल्या आणखी एका कारवाईत, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 4 किलो हस्तिदंत जप्त करून त्याच्या अवैध व्यापारात सहभागी असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या स्वाधीन केले
सात आणि आठ जुलै 2026 रोजी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी वन्यजीव तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ‘वन्यजीव गुन्हे
सात आणि आठ जुलै 2026 रोजी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी वन्यजीव तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग’च्या सहकार्याने ‘डीआरआय’ मुंबई आणि ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’च्या आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे राबवलेली ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई होती. या कारवाईत, ‘वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972’ च्या अनुसूची-1 मध्ये समाविष्ट असलेले विविध प्रजातींचे वन्यजीव हस्तगत करून त्यांची सुटका करण्यात आली. यामध्ये 15 स्लो लोरिस, 2 बिंटुरोंग, 28 स्टार कासवे, 6 इजिप्शियन गिधाडे आणि 2 शिक्रा पक्ष्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ‘डीआरआय’ने गोपनीय माहिती जमा केली होती आणि आता या प्रकरणाचा ‘सीबीआय’द्वारे तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर ‘सीबीआय’ने त्यांना अटक केली.
बेंगळुरू, वारंगल, पुणे, सुरत, चेन्नई, कोलकाता, त्रिची, मदुराई, श्रीकाकुलम, होजई (आसाम), राजस्थान, म्हैसूर आणि हावडा येथे डीआरआयने समन्वयाने राबविलेल्या मोहिमेत वन्यजीव उत्पादने जप्त आणि पुनर्प्राप्त करण्यात आली.यापैकी विविध कारवाई – सीबीआय, डब्ल्यूसीसीबी, बेंगळुरू, कोलकाता, त्रिची आणि मदुराई येथील सीमाशुल्क विभागाची विमानतळ गुप्तचर पथके, राज्य वन विभाग आणि स्थानिक पोलीस अशा कायदे अंमलबजावणी करणाऱ्या भागीदार संस्थांच्या मदतीने त्यांच्याशी निकटचा समन्वय साधून राबवण्यात आल्या.
गोपनीय माहितीच्या आधारे सातत्याने राबवण्यात आलेल्या या कारवाया संघटित वन्यजीव गुन्ह्यांचा बिमोड करण्याच्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी आणि वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करतात.



