vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अधिकाधिक निधी देऊन दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील- जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील- श्री क्षेत्र आरेवाडी येथे घेतले बिरोबाचे दर्शन- शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली ग्वाही

अधिकाधिक निधी देऊन दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील- जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील- श्री क्षेत्र आरेवाडी येथे घेतले बिरोबाचे दर्शन- शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली ग्वाही

सांगली, प्रतिनिधी – दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करावा अशी  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी प्रार्थना केली आहे. दुष्काळी भागाला अधिकाधिक निधी देऊन, या भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.

            कवठेमहांकाळ तालुक्यातील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान आरेवाडी येथे बिरोबा दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांची संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, जलसंपदा विभाग पुणेच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, प्रज्ञा यादव, राजन डवरी, अभिनंदन हरूगडे, हर्षद यादव आणि श्री. मासाळ आदि उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, दुष्काळी भागाला न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसा सिंचन योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. 2014 पासून टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या योजनेची बरीच कामे पूर्ण होऊन दुष्काळी भागाला पाणी मिळू लागले आहे. दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी उपमुख्यमंत्री आर. आर पाटील या दिवंगत नेत्यांसह अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. टेंभू योजनेसाठी नाबार्ड मधून 617 कोटी रुपये मंजूर आहेत. तसेच म्हैसाळ योजनेसाठी 919 कोटी रुपये मंजूर आहेत. टेंभू विस्तारित योजनेचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करू. तसेच येत्या एक ते दोन वर्षात उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच येथील विविध मागण्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले.

            आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, टेंभू व म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी या योजनेचे जुने पंप बदलणे आवश्यक असून विस्तारित टेंभू योजनेचे काम तात्काळ पूर्ण करावे. या माध्यमातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी या परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा. सर्व लोकांना पाणी मिळावे, असे आवाहन करून श्री बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मिळवून या मंदिराचा कायापालट करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            आमदार रोहित पाटील म्हणाले, बिरोबा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा. विस्तारीत टेंभू योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कामे गतीने पूर्ण करून या परिसराचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन कामांना गती द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

            आपल्या कालावधीत टेंभू योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन माजी खासदार संजय पाटील यांनी या योजनेची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.

            प्रास्ताविकात सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम यांनी टेंभू म्हैसाळ योजनेच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.

            श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टचे राजाराम कोळेकर यांनी बिरोबा मंदिर परिसर विकासासाठी निधी लवकरात लवकर मिळावा. तसेच टेंभू योजनेचे पाणी मिळावे जेणेकरून यात्रा कालावधीत भाविकांना पाणी टंचाईची कमतरता भासणार नाही, अशी मागणी यावेळी केली.

            सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता अमोल गुरव यांनी मानले. कार्यक्रमास आरेवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली भूडच्या वितरण हौदाची पाहणी,

        सांगली, प्रतिनिधी – टेंभू उपसा सिंचन प्रकल्प टप्पा पाच अंतर्गत खानापूर तालुक्यातील भूड येथील वितरण हौदाची राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, जलसंपदा विभाग पुणेच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, प्रज्ञा यादव, राजन डवरी, अभिनंदन हरूगडे, हर्षद यादव आणि श्री. मासाळ आदि उपस्थित होते.      गोरेवाडी डाव्या व उजव्या कालव्यावरुन तासगांव, खानापूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील ६,०१० हे. क्षेत्रास बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेद्वारे पाणी देण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने मंत्री श्री. विखे पाटील यांनी ही भेट देऊन पाहणी केली.

            पंपगृह टप्पा क्र.५ मधून उर्ध्वगामी नलिकेद्वारे पाणी बलवडी येथील वितरण हौदामध्ये सोडण्यात येते. बलवडी वितरण हौदामधून गोरेवाडी उजवा कालवा, गोरेवाडी डावा कालवा व भूड देविखिंडी कालवा हे तीन कालवे निघतात. टेंभू विस्तारीत प्रकल्पांतर्गत गोरेवाडी डाव्या कालव्यास समांतर गोरेवाडी डावी थेट गुरुत्व नलिका प्रस्तावित केलेली आहे. या नलिकेद्वारे तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ५४८२ हे. सिंचन क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावीत आहे

           गोरेवाडी उजव्या कालव्याच्या शेवटापासुन वायफळे बिरणवाडी वितरीका निघते. या वितरीकेद्वारे खानापूर व तासगाव तालुक्यातील ४९८ हे. सिंचन क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावीत आहे.

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

vishwatmaklokswamivarta

प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ प्रदर्शनाची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी- प्रदर्शनातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीप्रद स्टॉलला अनेक विकासक व नागरिकांची भेट

vishwatmaklokswamivarta

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta