
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
सांगली, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांअंतर्गत वसतिगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण, सांगली च्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि. 13 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे व जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती-क धनगर समाजातील विद्यार्थी वगळून) तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेऊनही वसतिगृह योजनेचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि. 21 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविदयालय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या भटक्या जमाती – क धनगर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये 2.50 लक्ष पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम रु.43,000/- व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम रु.38,000/-प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. या योजनेतंर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतेलेल्या पदवी आणि पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांकरिता https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता दि.30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
00000



