
उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य सचिवांना समन्स ! ८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही!
राज्य प्रतिनिधी
सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील भीषण प्रदूषणामुळे सोलापूरमधील ५ लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या विषारी परिणामांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. वारंवार स्मरण करून देऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशी अहवाल सादर न केल्याने, आयोगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांना २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता नवी दिल्ली येथे आयोगासमोर आवश्यक चौकशी अहवालासह स्वतः किंवा प्रकरणाची पूर्ण माहिती असलेल्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहण्याचे सशर्त समन्स बजावले आहे.
सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीनुसार, पुणे आणि सोलापूरमधून दररोज ४,२६२ दशलक्ष लिटर (MLD) प्रक्रिया न केलेले सांडपाणी उजनी खोऱ्यात सोडले जात आहे, ज्यामुळे पाण्यातील मँगनीजची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल ५१ पटीने वाढली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या संविधानात्मक ‘जगण्याच्या अधिकाराचे’ (Right to Life) थेट उल्लंघन होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.



