vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डोंबिवलीत ‘दत्तनगर बाल गणेश मंडळा’त रंगला ‘लोकसंवाद’आमदार राजेश मोरे यांच्याकडून योजनांचे कौतुक व सहकार्याची ग्वाही जिल्हा माहिती कार्यालय व महिला-बालविकास यंत्रणेच्या टीमवर्कला नागरिकांची पसंती..

डोंबिवलीत ‘दत्तनगर बाल गणेश मंडळा’त रंगला ‘लोकसंवाद’आमदार राजेश मोरे यांच्याकडून योजनांचे कौतुक व सहकार्याची ग्वाही जिल्हा माहिती कार्यालय व महिला-बालविकास यंत्रणेच्या टीमवर्कला नागरिकांची पसंती..

ठाणे, प्रतिनिधी: सार्वजनिक उत्सवांचे व्यासपीठ हे केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता ते सामाजिक परिवर्तनाचे आणि लोकजागृतीचे प्रभावी माध्यम ठरू शकते, याचे प्रत्यंतर डोंबिवलीत आले. माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती नमिता शिंदे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ अभियानांतर्गत, डोंबिवली पूर्व (ता. कल्याण) येथील नामांकित ‘दत्तनगर बाल गणेश मंडळ’ येथे महिला व बालसुरक्षेविषयी एका महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

    प्रशासकीय यंत्रणा आणि जनसंपर्क विभागाच्या सशक्त टीमवर्कमुळे थेट गणेश मंडपात पोहोचलेल्या या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत असून, प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींनी यात घेतलेला पुढाकार आणि भाविक-कार्यकर्त्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या उपक्रमाला मोठी दिशा मिळाली आहे.

   जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण अधिकारी (डोंबिवली) निकिता साबळे यांनी ‘दत्तनगर बाल गणेश मंडळा’स सदिच्छा भेट दिली. याच वेळी कल्याण ग्रामीणचे आमदार श्री.राजेश मोरे हेदेखील बाप्पाच्या दर्शनासाठी मंडपात उपस्थित होते. संरक्षण अधिकारी श्रीमती साबळे यांनी आमदार श्री. राजेश मोरे यांची भेट घेऊन महिला व बालविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. सामान्यतः अशा योजनांची माहिती प्रशासकीय फाइल्स किंवा कार्यालयांपुरतीच सीमित राहते; मात्र ती थेट गणेश मंडपात मांडली जात असल्याचे पाहून आमदार महोदयांना अत्यंत कुतूहल वाटले. त्यांनी स्वतः सर्व योजनांचे स्वरूप बारकाईने समजून घेत प्रशासनाच्या या कल्पक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. या संवेदनशील कार्याचा गौरव म्हणून आमदार महोदयांच्या उपस्थितीत मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते संरक्षण अधिकारी (डोंबिवली) यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. एवढेच नव्हे तर, “अशा लोककल्याणकारी योजना तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आमच्या माध्यमातून आणखी व्यापक जनजागृती कार्यक्रम आयोजित करू,” असा ठाम विश्वास आमदार राजेश मोरे यांनी या वेळी दिला.

    यानंतर मंडपात उपस्थित असलेल्या भाविक, नागरिक, महिला व मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांशी संरक्षण अधिकारी यांनी थेट संवाद साधण्यात आला. समाजातील अनाथ, निराधार आणि गरजू बालकांना शिक्षणासाठी व संगोपनासाठी आर्थिक आधार देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘बालसंगोपन योजने’चे निकष व अर्ज प्रक्रिया यावेळी समजावून सांगण्यात आली.

  याशिवाय, समाजात अजूनही घडणाऱ्या अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ आणि लहान मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करणाऱ्या कठोर ‘पोक्सो (POCSO) कायद्या’तील कायदेशीर तरतुदींची माहिती अत्यंत सोप्या भाषेत देण्यात आली. आपल्या परिसरातील बालकांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी कशी आहे, यावर या संवादात भर देण्यात आला.

     ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती नमिता शिंदे यांच्या सूक्ष्म नियोजनातून व परस्परांच्या उत्तम समन्वयातून (Teamwork) हा ‘लोकसंवाद’ उपक्रम गणेशोत्सवाच्या गर्दीत सामान्यांपर्यंत पोहोचत आहे. एरवी महिला व बालहक्कांचे कायदे किंवा शासकीय योजनांबद्दल सामान्य नागरिकांमध्ये अनभिज्ञता असते; मात्र गणेश मंडळाच्या मंडपात थेट अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन कायद्यांचे कवच आणि शासकीय लाभांची दालने उलगडून दाखवल्याने उपस्थित कार्यकर्ते आणि भाविकांनी मनस्वी समाधान व्यक्त केले असून, या नावीन्यपूर्ण व लोकहितैषी प्रशासकीय भूमिकेचे डोंबिवलीकरांकडून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

00000

 

 

संबंधित पोस्ट

नवकल्पनांना लोकसेवेशी जोडण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा – मंत्री मंगलप्रभात लोढा स्पर्धेसाठी १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार

vishwatmaklokswamivarta

युवकांसाठी किनवट येथे शिका आणि कमवा अंतर्गत 23 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*

आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा मित्रांची प्रशिक्षणासाठी निवड होणार-> इच्छुक युवकयुवतींना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा