
मोदी देशाचे प्रतिनिधित्व करतात, एका धर्माचे नव्हे – इलाहाबाद उच्च न्यायालय
लखनऊ प्रतिनिधी
न्यायालयात आपणच आक्षेपार्ह फोटो शेअर केला अशी कबुली दिली असली आणि माफी मागितली असली तरी अटक करण्यात आली तेव्हा कुरैशीने आपण असं काही केलं नसल्याचं म्हटल होतं इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एका खटल्याची सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने म्हटलं की, पंतप्रधान मोदींसह इतर जे घटनात्मक पदावर आहेत ते कोणत्याही एका वर्गाच्या किंवा धर्माच्या बंधनात बांधले जाऊ शकत नाहीत. असे लोक देशाच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात असं न्यायालयाने सुनावलं.
न्यायाधीश मोहम्मद फैज आलम खान यांच्या पीठाने सोमवारी या प्रकरणाची सुनावणी केली. यावेळी ६० वर्षांच्या कुरैशी यांचा जामीन मंजूर करण्यात आला. तसंच न्यायालयाने असं म्हटलं की, महान अशा देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह घटनात्मक पदावर असलेल्या सर्व लोकांचा तुम्ही आदर करा. देशाच्या प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे.कुरैशी यांनी व्हॉटसअॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केला होता. याविरोधात लखनऊमधील अमीनाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच या प्रकरणी कुरैशी यांना १९ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. न्यायालयात सुनावणीवेळी कुरैशी यांनी विनाअट माफी मागितली. त्यांनी म्हटलं की, माझ्या या बेकायदेशीर कृत्याची मला लाज वाटते. मोदींचा आक्षेपार्ह फोटो माझ्या फोनमधून अपलोड केला होता अशी कबुलीसुद्धा कुरैशी यांनी दिली.
दरम्यान, न्यायालयात आपणच आक्षेपार्ह फोटो शेअर केला अशी कबुली दिली असली आणि माफी मागितली असली तरी अटक करण्यात आली तेव्हा कुरैशीने आपण असं काही केलं नसल्याचं म्हटल होतं. कोणातरी समाजकंटकाने हे काम करून मला अडकवण्याचा कट होता असा दावा त्यांनी केला होता. पोलिसांनी केलेल्या ग्रुपवर कोणीही व्यक्ती असा फोटो कसा शेअर करेल असं कुरैशी यांनी त्यावेळी पोलिसांना सांगितलं होतं.



