सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गोलटगाव येथे CPHC प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव व सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, गोलटगाव येथे CPHC (Comprehensive Primary Health Care) अंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणासाठी ७ प्रशिक्षक होते. आजच्या प्रशिक्षण सत्रात ४७ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १३ प्रमुख आरोग्य सेवांबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविका सहभागी झाले. प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याला आवश्यक स्क्रीनिंग व आरोग्य तपासणी कौशल्यांबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
CPHC अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या परिसरातच सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
“Resolve More, Refer Less” या संकल्पनेनुसार प्राथमिक स्तरावरच अधिकाधिक आरोग्य समस्यांचे निराकरण करून अनावश्यक संदर्भित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धिंगत करण्यात आली. तसेच नागरिकांना वेळेत व त्यांच्या जवळच्या आरोग्य संस्थेत आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.