
महाराष्ट्रातील अकोला-खंडवा गेज परिवर्तनासाठी ८८८ कोटी…
अकोला : दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा अकोला-खंडवा-रतलाम या लोहमार्गाचे गेजपरिवर्तन करण्यासाठी सन २०२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी ८८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लागवण्यासाठी मेळघाट वाघ्रप्रकल्पाडा अडसर कधी दूर होईल, याबाबत अद्यापही संभ्रम असल्याने हा निधी केवळ अंदाजपत्रकापुरताच मर्यादित ठरू नये, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
अकोट ते खंडवापर्यंतचे गेजपरिवर्तनाचे भवितव्य अधांतरीच आहे. रतलाम-महू-खंडवा-अकोला या ४७३ किलोमीटर लांबीचा मीटरगेज मार्ग ब्राॅडगेजमध्ये रुपांतरित करण्यासाठी सन २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळच्या प्रस्तावानुसार एक हजार ४७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता या प्रकल्पाची किंमत चार हजार कोटीवर पोहोचली आहे. गत सहा अर्थसंकल्पांमध्ये यासाठी एक ९९६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यानंतरही महाराष्ट्रातील अकोट ते खंडवा व मध्य प्रदेशातील बलवाडा ते महू दरम्यान वनविभागाची मंजुरी व जमीन अधिग्रहणामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे. तब्बल ४७३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात अकोला ते अकोटपर्यंत ४३ किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या मर्गाची चाचणी जुलै २०२० मध्ये घेण्यात आली होती. दीड वर्ष उलटूनही या मार्गावरील मध्य प्रदेशात रतलाम ते महूपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतरही अकोट ते अमला खुर्द आणि सनावद ते महू असे एकूण १३१ किलोमीटरचे काम रखडल्याने कोणतीही गाडी सुरू होऊ शकली नाही.



