
राहुल गांधी जोपर्यंत सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना मुंबईत येऊ देणार नाही’ खासदार राहुल शेवाळे
मुंबई प्रतिनिधी
राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान सांगितले होते की, सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान तुरुंगातून सुटका करण्याबद्दल आणि त्यांना 60 रुपये पेन्शन मिळण्याबद्दल ब्रिटिश सरकारकडे माफीनामा लिहिला होता.
भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. सावरकरांचे नातू रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यापूर्वी रणजित सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्रात काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान विनायक दामोदर सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे.
विनायक दामोदर सावकार यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येऊ देणार नसल्याची धमकी शेवाळे यांनी दिली आहे. यासाठी दादर येथील शिवाजी पार्क येथील बाळ ठाकरे यांच्या स्मारकाजवळ आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलनावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, प्रवक्त्या शितल म्हात्रे उपस्थित होते.
राहुल गांधींनी वीर सावरकरांवर आरोप केल्यानंतर शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राहुल गांधींची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा थांबवण्यास सांगितले होते. ‘काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही वीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता, त्याविरोधात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी आंदोलन केले होते’, असे राहुल शेवाळे म्हणाले



