
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत सहभागासाठी विमा हप्ता ऑनलाईन पध्दतीने भरावा – कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने
ठाणे, प्रतिनिधी:- पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी काजू व आंबा पिकाकरिता 30 नोव्हेंबर 2023 आणि केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (सीएसएसी), बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. पीक विम्यासाठी फळपिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर बंधनकारक असल्याने ई पीक पाहणी ॲपद्वारे फळपिकांच्या नोंदी करून घ्यावे, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत ठाणे जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते आणि शेतक-यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते. शेतक-याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. येत्या आंबिया बहारासाठी योजनेमध्ये सहभागासाठी विमा पोर्टल सुरु झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे सरंक्षण करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी अथवा संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :-
ठाणे जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात केळी, आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. (आंबा, काजू फळपिक वय ५ वर्ष ) कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. एका शेतकऱ्यांस अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल.विमा अर्ज सोबत फळबागेचा जिओ टॅगिंग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता –
आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये व विमा हप्ता 21 हजार 700 रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपाये व विमा हप्ता 5 हजार रुपये असा असणार आहे. तर केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये व विमा हप्ता 7 हजार रुपये आहे.
00000000



