
२१ वी पशुगणना सप्टेंबरपासून; चार महिने चालणार मोहिम
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) – २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या सप्टेंबर महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. चार महिने म्हणजे ३१ डिसेंबर पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. दर तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षकांची या कामासाठी नेम्णूक करण्यात आली आहे,असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.डी. झोड यांनी कळविले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहिम राबवली जाते. यंदाची पशुगणना दि.१ सप्टेंबर पासुन सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली जात आहे. पशुगणनेसाठी प्रगणकाची नेमणुक केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात १४१६ गावांसाठी १६८ प्रगणक व ३५ पर्यवेक्षक असून शहरी भागासाठी २३१ वार्डांसाठी ६८ प्रगणक व १७ पर्यवेक्षक असे एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.
पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. या मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडून धोरण योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले.
पशुगणना आता मोबाईलवर
पाच वर्षापूर्वी पशुगणना झाली होती. त्यावेळी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरुन घेतली होती. आता प्रगणकांना स्वत:चे मोबाईल वापरावे लागणार आहेत. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. प्रगणकांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे,असे डॉ. झोड यांनी सांगितले.
०००००



