
शासकीय आरोग्य संस्थांमधील ऑगस्ट महिन्यातील ३१४३ प्रसुती सुखरुप
छत्रपती संभाजीनगर, जिमाका):- जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत महिलांची प्रसूती सुखरुप होत आहेत. ऑगस्ट महिन्यात अपवादात्मक वगळता इतर आरोग्य केंद्र व ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयातील ३१४३ प्रसूती सुखरुप झाल्या आहेत,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात ३१४३ प्रसूती
जिल्हयातील ग्रामीण, उपजिल्हा, स्त्री,जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी ३१४३ तर जिल्हयातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६५ एवढया प्रसूती झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी केवळ ऑगस्ट महिन्यातील आहे. गर्भवतींना वेळेत आणि मोफत रुग्णालयात दाखल होता यावे, यासाठी मोफत रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सुरक्षित घरी पोहचविण्यासाठीही आरोग्य विभागाचे वाहन असल्याचे सांगण्यात आले.
एखादी महिला गर्भवती असल्यापासूनच आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत फॉलोअप घेतला जातो. तसेच समुपदेशन करुन आरोग्य सल्लाही दिला जातो. वेळच्या वेळी तपासण्या केल्यास आणि वेळेत गर्भवतीला रुग्णालयात दाखल केल्यास भविष्यातील धोके टळू शकतात. त्यामुळे प्रत्येकप्रसुती ही शासकीय संस्थेत करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे अधिकारी यांनी केले आहे.
०००००



