
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर …
राज्य प्रतिनिधी बुलडाणा, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार मतदान दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने विविध आस्थापनांनी आपल्या कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सवेतन सुट्टी द्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार उद्योग विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुट्टी दिली जाईल. उद्योग विभागात येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, मंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदींनाही ही सुट्टी लागू राहील. या सुट्टीच्या कारणास्तव व्यक्तीचे वेतनात कपात केली जाणार नाही.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल तर कमीत कमी दोन तासांची सवलत द्यावी मात्र, त्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिका-यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता येणे शक्य झाले नाही अशी तक्रार मतदाराकडून झाल्यास आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.



