सेवेचे समाधान देणारा कार्यक्रम ‘दशसूत्री’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- ‘दशसूत्री’ शालेय शिक्षणातून आपल्या देशासाठी सत्शिल, प्रामाणिक व हुशार नागरिक घडविण्याचा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासहित सर्व बाबींची काळजी घेऊन त्यांचे आयुष्य घडवून शिक्षकांना आपल्या सेवेचे समाधान देणारा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
येथील छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात आज ‘दशसूत्री’ अंमलबजावणीसाठी फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जि.प. शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य.) आश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षणाधिकारी(योजना) अरुणा भुमकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सान्वी देशमुख, गटशिक्षणाधिकारी दिपाली थावरे, तहसिलदार मुनलोड व डॉ. कृष्णा कानगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, सहा. प्राध्यापक मनोज मते आदी याप्रसंगी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडविणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे. मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवित आहोत ह्या जबाबदारीचे भान असू द्यावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी दशसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता नाही. वेगळा वेळ द्यायची गरज नाही. हा कार्यक्रम आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करीत असतांनाच करता येणार आहे. या कामातून आपल्याला चांगले काम केल्याचे समाधान मिळणार आहे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. प्रास्ताविक श्रीमती आश्विनी लाटकर, सुत्रसंचालन मनोज मते तर दिपाली थावरे यांनी आभार मानले.०००००