बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
राज्य प्रतिनिधी –
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे आणि त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत.
असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
बजरंग सोनवणे,संदीप क्षीरसागर,जितेंद्र आव्हाडसह सुरेश धसांना सुरक्षा द्या- शरद पवार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतरही आरोपींवर या आधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे कट रचुन केल्याचे दिसून येत असल्याने सीआयडीकडून या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसे घडल्यास वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
तर दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधी बाकावरील नेत्यांसह सत्तेतील नेत्यांनीही धनंजय मुंडे आणि इतर संबंधितांवर आरोप करत केले आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंखे, यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांनी निवेदनात केली आहे.