vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विशेष लेख -उत्सवअभिजातमराठीचा

विशेष लेख -उत्सवअभिजातमराठीचा

 राज्य प्रतिनिधी-  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. हे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहे. शासनही याला पाठबळ देत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास : राज्य मराठी विकास संस्थेची भूमिका,भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाला अनुसरून 1 मे 1960 रोजी भारतीय संघराज्यांतर्गत मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. जुलै 1960 मध्ये मराठीचा शासनव्यवहारात वापर करण्याबाबतचे शासनाचे धोरण राबवण्यासाठी भाषासंचालनालयाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती ह्यांच्या विकासासाठी नोव्हेंबर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाची स्थापना करण्यात आली. (मराठी विश्वकोशाचे काम प्रथमतः साहित्य आणि संस्कृति मंडळाचा एक प्रकल्प म्हणून सुरू झाले असले तरी त्याची व्याप्ती पाहून 1980 मध्ये त्यासाठी स्वतंत्रपणे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना करण्यात आली.) 1965 मध्ये महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 द्वारे राज्याच्या प्रशासनिक व्यवहाराची भाषा म्हणून मराठी भाषा प्रस्थापित झाली. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 जून 1979 रोजी मुंबई येथे ‘महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमात व प्रशासनात मराठी भाषेचे स्थान’ या विषयावर एक परिषद घेतली होती. त्या परिषदेत मराठी भाषेसाठी एक राज्यस्तरीय संस्था स्थापण्यात यावी, अशी सूचना पुढे आली,पुढे शिक्षण व सेवायोजन विभागाच्या दि. 22 ऑक्टोबर 1990 च्या शासननिर्णयानुसार “मराठीस शासनात व देशात योग्य दर्जा मिळवण्यासाठी” मा. मुख्यमंत्री ह्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी भाषा उच्चाधिकार समिती’ स्थापन करण्यात आली. सदर समितीची पहिली बैठक दि. 18 नोव्हेंबर 1991 मध्ये घेण्यात आली. ह्या बैठकीत ‘राज्य मराठी विकास संस्था’ स्थापन करण्याच्या दृष्टीने विचार कऱण्यासाठी उपस्थित असलेल्या अशासकीय सदस्यांची एक उपसमिती (सुकाणू समिती) नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रा. वसंत बापट हे समितीचे अध्यक्ष होते. तर शिक्षण व सेवायोजन विभागाचे सचिव हे तिचे सदस्य-सचिव होते. ह्या समितीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. अशोक केळकर, डॉ. यू. म. पठाण अशा मराठीच्या विद्वान अभ्यासकांचा समावेश होता. एकंदर चार बैठका घेऊन समितीद्वारे प्रस्तावित राज्य मराठी विकास संस्थेची उद्दिष्टे, तिने हाती घ्यायचे कार्यक्रम, तिचे व्यवस्थापन, आवश्यक सुविधा, अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि आर्थिक तरतुदींची आवश्यकता ह्यांवर सांगोपांग विचार करून 11 मार्च 1992 रोजी समितीद्वारे आपला अहवाल शासनाला सादर करण्यात आला. राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना,त्या अनुषंगाने 30 एप्रिल 1992 च्या शासननिर्णयाद्वारे मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक 1 मे 1992 रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना करण्यात आली.. मराठी भाषेच्या प्रशासकीय, साहित्यिक-सांस्कृतिक आणि ज्ञानकोशात्मक संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने ह्यापूर्वीही संस्था उभारल्या होत्या हे लक्षात घेता राज्य मराठी विकास संस्थेद्वारे त्या संस्थांच्या कार्याहून वेगळे आणि व्यापक कार्य होणे शासनाला अभिप्रेत होते असे अनुमान निश्चितच करता येते.

संस्थेची कार्यकक्षा,राज्य मराठी विकास संस्थेचे स्वरूप आणि सुकाणू समितीच्या अहवालात तसेच संस्थेच्या घटनेत नोंदवण्यात आलेल्या उद्दिष्टांचा विचार केला तर ह्या संस्थेचे वेगळेपण अधोरेखित होते. ‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास’ हे संस्थेचे बोधवाक्य आहे. त्यावरून ह्या संस्थेच्या व्यापक कार्यकक्षेची कल्पना येऊ शकेल. राज्य मराठी विकास संस्था ही मुख्यत्वे विद्याशाखीय (ॲकॅडेमिक) स्वरूपाचे कार्य करणारी संस्था आहे. विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा ह्यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही ह्या संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्दिष्टे आहेत.ह्या उद्दिष्टांना अनुसरून विविध स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्थेद्वारे स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेण्यात येत असतात. तसेच भाषा व संस्कृती ह्या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांशी समन्वय साधून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्थेद्वारे राबवण्यात येतात.मराठी भाषेचा स्वभाषा म्हणून तसेच परभाषा म्हणून अभ्यास, मराठीच्या विविध प्रादेशिक आणि सामाजिक बोलींचा अभ्यास व त्यांतून साकारणारी सांस्कृतिक वैशिष्ट्ये ह्यांचा अभ्यास, शासनव्यवहार तसेच इतर विविध व्यवहारक्षेत्रे आणि विद्याशाखा ह्यांतील मराठी भाषेच्या वापराविषयीचे अभ्यास आणि सर्वेक्षणे, महाराष्ट्राबाहेरील देशातील व अन्य देशांतील मराठी भाषक-समूहांना मराठीच्या व्यापक विस्ताराद्वारे जोडून घेऊन त्या त्या ठिकाणच्या मराठीच्या व्यवहाराला प्रोत्साहन व बळ देणे तसेच तेथील भाषावैशिष्ट्यांचा अभ्यास करणे, मराठीला तंत्रज्ञानाची जोड लाभावी ह्यासाठी सक्रिय प्रयत्न करणे आणि ह्या सर्वांतून मराठीच्या व्यापक सांस्कृतिक अवकाशाला विस्तारणे ही संस्थेच्या स्थापनेमागची व्यापक उद्दिष्टे लक्षात घेऊन संस्थेचे आजवरचे काम होत आलेले आहे.: मराठीचा स्वभाषा म्हणून अभ्यास,स्वभाषा म्हणून मराठी भाषेचा अभ्यास व्हावा ह्यासाठी संस्थेद्वारे विविध प्रकल्प, उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ह्यासाठी मराठी लेखनमार्गदर्शिका, शालेय मराठी शब्दकोश, विज्ञान संकल्पना कोश तसेच भाषावैज्ञानिक दृष्टिकोणातून मराठीच्या विविध वैविध्यांचा आढावा घेणारे लेखनही (उदा. वृद्धी : भाषा आणि भाषाव्यवहार, बेलभाषा, भाषा आपली सर्वांचीच इ.) संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे.

तसेच संंस्थेद्वारे श्री. शंकर गणेश दाते ह्यांच्या मराठी ग्रंथसूचीचे (1800 ते 1950) पुनर्प्रकाशन करण्यात आले. ह्या सूचीत 1800 ते 1950 ह्या कालखंडातील मुद्रित मराठी ग्रंथांच्या विषयवार माहितीचा समावेश आहे. इतक्यावरच न थांबता संस्थेद्वारे इ. स. 2000 पर्यंतच्या मुद्रित ग्रंथांच्या सूचीचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यांपैकी 1986 पर्यंतच्या ग्रंथसूचीचे काम पुस्तकरूपात उपलब्ध आहे. ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेरील विविध संग्रहांत (तंजावूर, हैदराबाद, कर्नाटक, त्रिवेंद्रम, मद्रास) उपलब्ध मराठी हस्तलिखितांच्या सूची संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

मराठीचा परभाषा म्हणून अभ्यास,सध्याचे जग हे बहुभाषक असल्यामुळे महाराष्ट्राबाहेरील किंवा अन्यभाषक समाजघटकांना मराठी भाषा आणि संस्कृती ह्यांच्याशी जोडून घेण्याच्या उद्देशाने संस्थेद्वारे करुणाष्टक, माचीवरला बुधा, टिकलीएवढं तळं, मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे, कल्याणी, दिवसेंदिवस, एका श्वासाचं अंतर इत्यादी महत्त्वाच्या मराठी साहित्यकृतींची हिन्दी भाषांतरे करून घेऊन प्रकाशित केली आहेत. त्याबरोबरच मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाद्वारे अन्य भाषकांना संवादात्मक पद्धतीने मराठी शिकवण्याच्या आधुनिक पद्धतींवर आधारित असा माय मराठी हा अभ्यासक्रम आणि त्यासाठी अभ्याससामग्री संस्थेद्वारे तयार करून महाजालावरून मुक्त (फ्री ॲण्ड ओपन सोर्स) स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मराठीच्या बोलींचा अभ्यास-मराठीच्या प्रमाणभाषेसोबतच मराठीच्या विविध प्रादेशिक आणि सामाजिक बोलींचा अभ्यास होत राहणे आवश्यक असल्याने संस्थेद्वारे मराठीतील दलित आणि ग्रामीण साहित्यप्रवाहांतील साहित्यकृतींत येणाऱ्या शब्दांचा कोश (तीन भागांत) सिद्ध करून प्रकाशित केला आहे. पालघर जिल्ह्यातील बोलींचा भाषावैज्ञानिक अभ्यास आणि वऱ्हाडी बोलीतील शब्द आणि वाक्प्रचार ह्यांचे कोश संस्थेने तयार करवून घेतले आहेत.ह्यासंदर्भात मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन हा संस्थेचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर मराठी भाषेचे विविध भाषाभेद आढळतात. ह्या विविध भाषाभेदांना आपण मराठीच्या बोली असे संबोधत असतो. मराठी भाषेतील ह्या भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवरच्या वैविध्याचे भाषावैज्ञानिक वर्णन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 2017 ते 2023 ह्या कालावधीत हा प्रकल्प राबविण्यात आला.ह्या प्रकल्पांतर्गत गोळा करण्यात आलेली आणि निर्माण करण्यात आलेली सर्व सामग्री https://sdml.ac.in/mr ह्या स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासकांबरोबरच सामान्य माणसांनासुद्धा हा डिजिटल संग्रह मनोरंजक वाटेल.

शासनव्यवहार आणि मराठी,शासनव्यवहारात मराठीचा वापर होत असताना तो वापर क्लिष्ट अथवा बोजड आहे असे अनेकांचे म्हणणे असते. ह्यासंदर्भातील वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनिक कामकाजाची भाषा म्हणून मराठी भाषा कशी विकसित होत गेली. ह्या भाषेची वैशिष्ट्ये कोणती अशा प्रश्नांची सखोल चर्चा करून स्पष्टीकरणे देणारे प्रशासनिक मराठी भाषेचा विकास हे पुस्तक संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच मराठी लघुलेखनकोशही संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.

व्यवहार आणि विद्याशाखा-ह्याचबरोबर विविध विद्याशाखा आणि व्यवहार ह्यांत मराठी भाषेचा वापर सुकर व्हावा ह्या हेतूने त्या क्षेत्रांतील पारिभाषिक संज्ञा मराठीतही निर्माण करणारे काही प्रकल्प संस्थेद्वारे राबवण्यात आले.यंत्रालयातील म्हणजे कारखान्यातील विविध यंत्रे आणि यंत्रणा ह्यांची माहिती मराठीत देणारा श्री. शं. गो. भिडे ह्यांचा यंत्रालयाचा ज्ञानकोश, दत्ताजीराव कदम टेक्स्टाइल इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला अनेकखंडी वस्त्रनिर्मिती माहितीकोश (खंड 1 ते 5 व 7 प्रकाशित) ही संस्थेची महत्त्वाची प्रकाशने आहेत.

मराठी आणि तंत्रज्ञान-आधुनिक काळाची पावले ओळखून संगणकीय व्यवहारात मराठीचा वापर सुकर करण्यासाठी यशोमुद्रा आणि यशोवेणू ह्या मराठी टंकांची (फॉंटची) निर्मिती संस्थेने केली आहे. तसेच हे टंक मुक्त (फ्री ॲण्ड ओपन सोर्स) परवान्यांतर्गत उपलब्ध करून दिले आहेत. ह्याचबरोबर नागरिकांना मराठीत संगणकावर व्यवहार करणे सुलभ व्हावे ह्यासाठी संस्था युनिकोड संकेतप्रणाली वापरून मराठीत कसे लिहायचे ह्यासंदर्भातील कार्यशाळा आयोजित करत आली आहे. तसेच मराठी विकिपीडियाविषयी जागृती करणाऱ्या कार्यशाळा आणि लाटेक् (LaTeX) ह्या आज्ञावलीचा वापर मराठी अक्षरजुळणीसाठी कसा करावा हे शिकवणाऱ्या कार्यशाळांचेही आयोजन संस्थेद्वारे करण्यात येत असते.सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाचनचळवळ समृद्ध करण्यासाठी तसेच मराठीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचे अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी ह्यांच्यासाठी उपयुक्त अशी दुर्मिळ ग्रंथसंपदा आणि नियतकालिके, इ-बुक्स, श्राव्य पुस्तके राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तंत्रज्ञानामुळे ही सर्व सामग्री राज्यासोबतच भारतभर आणि जगभरातील कानाकोपऱ्यात आता उपलब्ध झाली आहे.संस्थेद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेने मराठीतील उत्तमोत्तम साहित्य श्राव्य पुस्तकांच्या स्वरूपात जतन करून विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. त्यात दासबोध, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांच्या कविता तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यंत्री ना. यशवंतरावजी चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र अशा साहित्याचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेचे देशिकार लेणे म्हणून विख्यात अशा ज्ञानेश्वरीचे श्राव्य पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्याला अल्पावधीतच जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. https://rmvs.marathi.gov.in/बृहन्महाराष्ट्रातील मराठी,महाराष्ट्रातील मराठी भाषकांसह महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषकांचेही विस्मरण होऊ न देण्याची काळजी संस्थेद्वारे घेण्यात येत असते. तसे पाहता मध्ययुगीन कालखंडापासून मराठी भाषा महाराष्ट्राबाहेरही आपले स्थान राखून आहे आणि ती इतर भारतीय भाषांच्या संपर्काने समृद्धही होत आली आहे. मध्ययुगीन मराठीच्या ह्या समृद्धीचा आढावा घेणारा दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहास हा प्रकल्प संस्थेने पूर्ण केला असून ह्यात तंजावर आणि आंध्र-कर्नाटक ह्या प्रदेशांतील मध्ययुगीन मराठी साहित्याचा संशोधनात्मक आढावा अभ्यासकांद्वारे घेण्यात आला आहे. उर्दूचा उगम म्हणून मान्यता असणाऱ्या दखनी भाषेशी मराठीचा संबंध दाखवणारे दखनी भाषा : मऱ्हाटी संस्कृतीचा एक आविष्कार हे पुस्तक तसेच दाक्षिणात्य साहित्य संस्कृतीचा मराठीशी अनुबंध स्पष्ट करणारे पुस्तकही संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळे : अर्थसहाय्य योजना,महाराष्ट्र राज्याने 2010 साली स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणातील प्रकरण 4 “भाषा आणि साहित्य” याअंतर्गत “महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येते.तसेच महाराष्ट्राची व्यवहारभाषा, प्रशासनिक भाषा आणि ज्ञानभाषा ह्या तिनही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविणे, शासनव्यवहाराच्या प्रशासन, कायदा, न्याय, जनसंपर्क अशा विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये मराठी भाषेचा लोकाभिमुख आणि सुलभ वापर वाढविण्यासाठी भाषिक उपक्रम हाती घेणे व उपकरणे निर्माण करणे. या उद्दिष्टांना अनुसरून राज्य मराठी विकास संस्थेमार्फत महाराष्ट्रातील मराठी भाषेसंदर्भात संशोधन करणारे संस्था / मंडळ यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना-राज्य मराठी विकास संस्थेचे काम मुख्यत्वे मराठी भाषेचे जतन, संगोपन आणि भारतासह जगभरात संवर्धन करणे, प्रचार-प्रसार करणे हे आहे. या अंतर्गतच राज्य मराठी विकास संस्थेद्रारे आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली असून. या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा मुख्य उद्देश म्हणजे माय मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे, जगभरात तिचा वारसा कसा पुढे नेला जाईल, यासाठीचे प्रयत्न करणे अशी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या स्थापनेमागील भूमिका आहे. मा. डॉ. ज्ञानेश्वरजी मुळे ह्यांची ह्या मंचाचे समन्वयक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देशभरातील 17 उप-समन्वयकांची निवड केली. या समन्वयकांमार्फत आंतरराष्ट्रीय मंचावर अर्थात देशाच्या बाहेरील अनेक भागात माय मराठीचा प्रचार आणि प्रसार कसा होईल, ही माय मराठी साता समुद्रापार कशी नेता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच ज्या ज्या देशात मंचाचे सदस्य कार्यरत आहेत त्या त्या ठिकाणी आता मराठी वर्ग सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. तसेच जगभरात आधिकाधिक मराठी माणसांत मराठीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी अधिक प्रमाणात उप-समन्वयकांची नेमणूक राज्य मराठी विकास संस्थेद्वारे करण्यात येणार आहे.

विश्व मराठी संमेलन-आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा षिभागाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या विश्व मराठी संमेलन या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच की माय मराठीचा जगभरात प्रचार आणि प्रसार व्हावा, तिचे जतन आणि संवर्धन या दृष्टीनेही संबंध जगभरात प्रयत्न व्हावेत.विश्वभरातून मराठी माणून एकाच छताखाली एकत्र आणण्यासाठीचे उत्तम माध्यम म्हणजे विश्व मराठी संमेलन हे होय. ह्या विश्व संमेलनात जे जगभरात मराठी भाषिक उद्योजक कार्य करीत असतात ते एकाच छताखाली येऊन तीन दिवसीय विश्व मराठी संमेलनामध्ये विविध विषयांवर चर्चासत्रे, कला व साहित्य आणि माय मराठीचा वारसा पुढे नेण्यासंदर्भात अनेकविध कार्यक्रम राबवले जातात.2023 च्या जानेवारीत पहिले मराठी विश्व संमेलन पार पडले. या पहिल्या-वहिल्या विश्‍व मराठी संमेलनाला प्रचंड यश मिळाल्याचे आपल्याला दिसून येते. ह्या विश्व मराठी संमेलनामध्ये तीनही दिवस अत्यंत सुंदर आणि दिमाखदार असे माय मराठीचे कार्यक्रम झाले. ह्या संमेलनास महाराष्ट्रासह देश-विदेशातून अनेक नामवंत मराठी साहित्यिक, उद्योजक उपस्थित होते.दि. 27, 28 आणि 29 जानेवारी 2024 ह्या तीन दिवसांच्या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र, नवी मुंबई येथे दुसरे मराठी विश्व संमेलन आयोजित करण्यात आले. ह्या संमेलनाच्या व्यासपीठावर माय मराठीची जोपासना, तिचा प्रचार, प्रसार आणि भविष्यात आपण ताच्यासाठी काय करावे ह्याविषयी ऊहापोह करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि भाषा सल्लागार समिती या तीनही मंडळाचे अध्यक्ष, ख्यातकीर्त वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर असे अनेक विद्वान या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. मुख्यत्वे मा. राज ठाकरे ह्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थित मराठी जनांस संबोधित केले.

मराठीच्या वाचनसंस्कृतीचे संवर्धन,कोणत्याही भाषेच्या समृद्धीचे दर्शन तिच्या साहित्यव्यवहारातून घडत असते आणि आधुनिक काळात ज्ञानव्यवहार हा लिखित मुद्रित माध्यमावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो हे लक्षात घेऊन संस्थेद्वारे मराठी भाषेतील वाचनसंस्कृती वाढावी ह्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुस्तकांचं गाव,”हे ऑन वे” या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर “पुस्तकांचं गाव” ही संकल्पना अस्तित्वात येऊन पुस्तकांचं गाव या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन दि.4 मे, 2017 रोजी करण्यात आले. पुस्तकांचं गाव या योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या उद्देशाने “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना आकारास आली.भिलार गावातील घरे, लॉज आणि शाळा, मंदिरे अशी सार्वजनिक ठिकाणे मिळून 35 जागा निवडण्यात आल्या आहेत. या जागांमध्ये साहित्य प्रकारांनुसार प्रत्येकी सुमारे 800 ते 1200 पुस्तके, अशी सुमारे 35,000 पुस्तके ठेवण्यात आली आहेत, प्रकल्पास भेट देणारे वाचक-पर्यटक पुस्तकांचा लाभ घेतात. संबंधित घरमालकांनी त्यांच्या घरांतील सुमारे 150 ते 500 चौरस फूट जागा वाचन सेवेसाठी विनाशुल्क/ विनामोबदला उपलब्ध करुन दिली आहे. गेल्या 6 वर्षांत सुमारे 5 ते 6 लाख पर्यटकांसह विविध क्षेत्रांतील शेकडो मान्यवरांनी भेट देऊन गौरविले. सध्या एकूण 35 दालने (घरे व सार्वजनिक ठिकाणे) कार्यरत आहेत.

पुस्तकांचं गाव-विस्तार योजना,पुस्तकांचं गाव ह्या प्रकल्पाच्या विस्तार योजनेतील मालपेवाडी, पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील पुस्तकांच्या गावाच्या पहिल्या दालनाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा दि. 10 मार्च 2024 रोजी संपन्न झाला. विस्तार योजनेतील मालपेवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात मालपे ॲग्रो टूरिझम यांच्या कार्यालयात पुस्तकांचं गाव कार्यरत करण्यात आले असून पुढील काळात गावातील अन्य ठिकाणीही पुस्तकांची दालने सुरू करण्यात येणार आहेत. विविध साहित्य प्रकारांनुसार तसेच सर्वकाळ लोकप्रिय असणारी पुस्तके ह्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून येत्या काळात मराठी साहित्याचे वाचक व अभ्यासक या ग्रंथदालनाचा लाभ घेऊ शकतील.

पहिल्या टप्प्यातील विस्तार योजनेतील मालपेवाडी, पोंभुर्ले येथील पुस्तकांच्या गावाच्या उद्घाटनानंतर पुढील काळात वेरुळ, नवेगाव बांध आणि अंकलखोप येथेही पुस्तकांचं गाव उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरच ही गावेही वाचक-पर्यटकांसाठी सुरू होतील.

कवितांचं गाव-भिलार येथे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव अस्तित्वात आले. ह्याच धर्तीवर भारतातील पहिले कवितेचे गाव, कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे जन्मगाव असलेल्या उभादांडा, ता. वेंगुर्ला येथे अस्तित्वात येत असून देशातल्या पहिल्या कवितेच्या गावाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा दि. 10 मार्च 2024 रोजी संपन्न झाला.येथे येणाऱ्या सर्वच वाचक-पर्यटकांना मंगेश पाडगांवकरांच्या कवितेबरोबर महाराष्ट्रातील सर्वच नामवंत कवीच्या कवितांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यातून उद्याचे अनेक कवी जन्माला येतील असा आशावाद आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यटनासाठी येणारे पर्यटक विविध अस्सल कोकणी मेव्यासोबतच काव्यांचाही आनंद घेतील, वाचनसंस्कृती वाढवतील, माय मराठीचा प्रचार-प्रसार करतील.

महत्त्वाचे वार्षिक उपक्रममराठी भाषा गौरव दिन27 फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ह्या मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने मराठी भाषा विभागाद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ह्या आयोजनात राज्य मराठी विकास संस्थेचा सहभाग असतो.: मराठी भाषा संवर्धन पुरस्कारराज्य मराठी विकास संस्थेद्वारे मराठी भाषेचा (ललित साहित्य वा वाङ्मयाखेरीज इतर व्यवहारक्षेत्रे या संदर्भातील) शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारी महाराष्ट्रातील तसेच बृहन्महाराष्ट्रातील व्यक्ती/संस्था यांना अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्कार तसेच मराठी भाषेचे जतन, संवर्धन व वाचन संस्कृती अशा विविध क्षेत्रात अनमोल योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच बृहन्महाराष्ट्रातील व्यक्ती/संस्था यांना मंगेश पाडगांवकर मराठी-भाषा-संवर्धक पुरस्कार असे दोन महत्त्वाचे पुस्कार सन 2015 पासून प्रदान करण्यात येतात. हे पुरस्कार मराठी भाषा गौरव दिनी आयोजित कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.

वाचन प्रेरणा दिन-15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ह्यानिमित्ताने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा,महाराष्ट्र-शासनाच्या वतीने दि. 14 जानेवारी ते दि. 28 जानेवारी ह्या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात येत असते. ह्या कालावधीत राज्य मराठी विकास संस्थेतर्फे विविध भाषिक कार्यक्रम प्रत्यक्ष आणि महाजालीय स्वरूपात आयोजित करण्यात येतात.राज्य मराठी विकास संस्थेच्या या उपक्रमांच्या माध्यमातून त्या त्या वेळी मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी, संवर्धनासाठी तसेच वाचन संस्कृती संवर्धित करून तिला अधिक समद्ध करण्यासाठी सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेच्या संदर्भातील हे उपक्रम राबवितांना महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे यांचेदेखील वेळोवेळी मोलाचे सहकार्य राहिले आहे.

आगामी प्रकल्पअरबी-तुर्की-मराठी व्युत्पत्तिकोश, भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलीअभ्यास संपादित इ-पुस्तक असे विविध प्रकल्प आगामी काळात राज्य मराठी विकास संस्थेद्वारे राबविण्यात येणार आहेत.अशा रीतीने मराठीच्या विकासासाठी विविधांगी प्रकल्प आणि उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेद्वारे राबवण्यात येत आहेत. मराठीच्या विकासासाठी आवश्यक ते संशोधन करून अभ्यासकांसाठी सामग्री उपलब्ध करून देण्याचे कार्य आजवर संस्था करत आली आहे. असेच कार्य पुढे चालत राहावे ह्यासाठी मराठी भाषक समाजानेही संस्थेचे काम पाहून आवश्यक तो प्रतिसाद सूचनांच्या, कौतुकाच्या वा टीकेच्या स्वरूपातही दिला तरी संस्थेला आपल्या पुढील वाटचालीसाठी साहायभूत ठरणार आहे.

शामकांत देवरे,                                  संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई

संबंधित पोस्ट

भाषिक भेदभावाची भूमिका संविधानविरोधी असून परप्रांतीयांवर दादागिरी करणे योग्य नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे-सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात जनजागृती कार्यक्रमातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…