सुधागडातील सर्व समाज एकत्र येणार! महाराष्ट्रातील सर्वात पहिलीच क्रांतिकारी घटना!!
सुधागड ः प्रतिनिधी सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालीतील मराठा समाज हॉल येथे नुकतीच 18 समाज जाती बांधवांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी 18 समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते. एकाचवेळी 18 समाजाने एकत्र येवून महाराष्ट्रातील सुरू असलेल्या जाती-धर्मातील दूरी हटवून सर्व समाजबांधव एकत्र राहतील यासाठी एकत्रित मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व समाज बांधवांनी धनंजय साजेकर यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत समाजबांधवांना एकत्र वाटचाल करण्यासाठी पुढे येण्याचा आशावाद व्यक्त केला.
गेले दोन वर्षात सुधागड तालुका मराठा समाजाने वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव असे काम केलेले आहे. ते नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. याची प्रचिती पुन्हा आली आहे. सुधागड तालुकास मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्याच संकल्पनेतून आणि सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने व मराठा समाजाचे पुढाकाराने पाली येथील मराठा समाज भवनात दिनांक 28 मार्च 2025 रोजी सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या अशा एकूण 18 समाजाचे अध्यक्ष यांची बैठक झाली. एकाच वेळी अठरा समाजाचे अध्यक्ष एकत्र येऊन सकारात्मक चर्चा करणे ही एक खूप मोठी गोष्ट / घटना आहे. या बैठकीला 18 जातीचे समाज अध्यक्ष उपस्थित होते. यामध्येइ 1) मराठा समाज – धनंजय साजेकर, 2) आगरी समाज – ललित ठोंबरे, 3) आदिवासी समाज – चंद्रकांत वाघमारे, 4) बौद्ध समाज – दिपक पवार , 5) बौद्धसमाज-2- सुरेंद्र शिंदे, 6) ब्राह्मण समाज – धनंजय गद्रे, 7) जैन समाज – सुभाष ओसवाल 8) गुजराथी समाज -अशोक मेहता, 9) राव मराठा समाज – भास्कर दुर्गे ( युवा अध्यक्ष), 10) भोई समाज – कमलाकर शिंदे, 11) ठाकूर समाज – गोविंद लेंडी, 12) मुसलमान समाज – सलाम पानसर , 13) कासार समाज – परेश वडके, 14) सोनार समाज -संजय घोसाळकर, 15) गुरव समाज – प्रमोद खोडागाळे, 16) नाभिक समाज – रूपेश पवार, 17) सुतार समाज – रमेश सुतार (जिल्हा उपाध्यक्ष), 18) परीट समाज – वसंत पालकर ( सुधागड-रोहा उपाध्यक्ष)
या बैठकीत सुधागड तालुक्याचे हित, तालुक्यात शांतता, सलोखा व एकोपा रहावा , विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढावा, जाती-जाती / धर्मातील दूरी दूर व्हावी, सुधागड तालुक्यात परिवर्तन करून एकसंघ सुधागड निर्माण करावा याबाबतीत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्व समाज एकत्रित करण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असून सर्वच अध्यक्षांनी या बाबतीत मराठा समाज अध्यक्षांचे कौतुक केले व मराठा समाजाला धन्यवाद दिले.
लवकरच तालुक्यातील उर्वरीत लहान मोठे सर्व समाज एकत्र करून राजकारण विरहित एकसंघ सुधागड निर्माण करण्याच्या मराठा समाजाच्या निर्धाराला सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला.
या बैठकीत मराठा समाज कार्याध्यक्ष निंबाळकर सर यांनी सर्वांचे स्वागत केले त्यानंतर मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी या बैठकीमागचा हेतू / उद्देश व पुढील भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. सुधागड तालुक्यात आजपर्यंत नेहमीच शांतता राहिलेली आहे परंतु सद्ध्य परिस्थितीत, डिजिटल मिडिया, सोशल मीडिया आणि इतर माध्यमे, बाहेरील घटना किंवा अन्य कारणांमुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार/घटना आपल्या तालुक्यात घडू नये यासाठी हे संघटन असणे अत्यंत गरजेचे आहे असे साजेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.आपण कोणत्याही परिस्थितीत या संघटनेत राजकारण येऊ द्यायचे नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे गुजराथी समाज अध्यक्ष अशोक मेहता यांनी सांगितले. असे संघटन गरजेचे असून संख्येने लहान असलेल्या समाज बांधवांना उपयोग होईल अशा या सामाजिक संघटनेस पूर्ण पाठिंबा व सहकार्य असल्याचे ब्राह्मण समाज अध्यक्ष धनंजय गद्रे, जैन समाज अध्यक्ष सुभाषशेठ ओसवाल, आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, गुरव समाज अध्यक्ष प्रमोद खोडागळे व ठाकूर समाज अध्यक्ष गोविंद लेंडी ,मुसलमान समाज अध्यक्ष सलाम पानसरे , परीट समाजाचे वसंत पालकर व नाभिक समाजाचे रुपेश पवार यांनी सांगितले. ही संकल्पना खूप महत्त्वाची असून त्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी सोनार समाज अध्यक्ष संजय घोसाळकर, भोई समाज अध्यक्ष कमलाकर शिंदे ,कासार समाजाचे परेश वडके तसेच सुतार समाजाचे व पाली पंचायत समिती माजी सभापती रमेश सुतार यांनी दाखवली. बौद्ध समाजाचे वतीने सुरेंद्र शिंदे यांनी याचे कौतुक केले व महत्व पटवून सांगितले तर दीपक पवार यांनी या माध्यमातून सामाजिक प्रश्न,गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत आदी कामे करता येतील असे सांगितले. आगरी समाज अध्यक्ष ललित ठोंबरे यांनी या संकल्पनेचे कौतुक करून समाजा-समाजातील दरी कमी होईल व सुधागड मधे सलोखा वाढेल असे प्रतिपादन केले. राव मराठा समाजाचे युवा अध्यक्ष भास्कर दुर्गे यांनी अठरा पगड जाती तसेच इतर धर्मांना सोबत घेऊन जाण्याने आपण प्रभावित झालो असून हा एकोपा आपण सर्वजण मिळून कायम ठेवू असा विश्वास व्यक्त केला.
वरील समाजांचे व्यतिरिक्त तालुक्यातील उर्वरित सर्व समाज अध्यक्षांनी ललित ठोंबरे, संजय घोसाळकर, परेश वडके यांच्याकडे अथवा वरील कोणत्याही अध्यक्षांसोबत संपर्क साधावा, एप्रिल महिन्यात पुन्हा सर्व समाज एकत्रित बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी सांगितले. यानंतर सुधागड तालुका मराठा समाज सरचिटणीस सुजित बारसकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सभा संपन्न झाली.