
तुम्हाला मुस्काटदाबी नाही करु देणार, विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकरांचा इशारा..
प्रतिनिधी,
मुंबई: भाजपाच्या (Bjp) १२ आमदारांचं काल वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. या मुद्यावरुन आता राज्यभरात भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात वगेवेगळ्या ठिकाणी भाजपाची आंदोलन सुरु आहेत. विधिमंडळ परिसरातही याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या आमदारांनी आंदोलन केलं. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली.
“लोकशाहीचा खून, हत्या करण्याचं काम ठाकरे सरकारने केलय. विधिमंडळात शेतकरी, ओबीसी, मराठा आरक्षण आणि एमपीएसई असे गंभीर विषय असताना, सरकार मुस्काटदाबी करण्याचं काम करतय” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. “जनतेचे प्रश्न, जनतेच्या मनातील असंतोष सभागृहात मांडण्यापासून रोखण्याचं काम हे सरकार करतय” असे प्रवीण दरेकर म्हणाले.
लोकशाहीचा खून, मुडदा या सरकारने पाडलाय असा आरोप त्यांनी केला. “नियमबाह्य पद्धतीने १२ आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला आहे. आपल्या देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. तुम्हाला अशा पद्धतीने मुस्काटदाबी करता येणार नाही. आज हजार ठिकाणी आंदोलन सुरु आहेत, हा वणवा असाच पेटत जाईल” असा इशारा दरेकर यांनी दिला.



