कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना-शासनास जमिन विक्री करू इच्छिणाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2018 नुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिनांक 15 ऑगस्ट 2018 पासून सुधारीत पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरिता सांगली जिल्ह्यातील जे जमिन मालक रेडीरेकनरनुसार किंवा जिरायत जमिनीकरिता 5 लक्ष रूपये प्रति एकर तर बागायत जमिनीकरिता 8 लक्ष रूपये प्रति एकर या दराने शासनास जमीन विक्री करू इच्छितात त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगलीचे सहायक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे
सुधारीत योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमीहिन कुटुंबांना 4 एकर जिरायत (कोरडवाहू) जमीन किंवा 2 एकर बागायत (ओलीताखाली) जमीन 100 टक्के शासकीय अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते. त्याकरिता खाजगी जमीन मालकांकडून जमीनीच्या रेडिरेकनरनुसार किंमत अथवा जिरायत जमिनीकरिता 5 लक्ष रूपये प्रति एकर तर बागायत जमिनीकरिता 8 लक्ष रूपये प्रति एकर या दराने जमीन खरेदीकरिता सांगली जिल्ह्यातील जमीन मालकांकडून जमिन विक्रीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
जमिन विक्रीसाठी जमिन मालक यांनी सादर करावयाची कागदपत्रे – जमिन मालकाचा जमिन विक्रीसाठीचा अर्ज, जमिनीचा 7/12 उतारा तसेच शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबधित तलाठी यांचे प्रमाणपत्र, संबंधित परिसरातील सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची तसेच कोणत्याही वित्तीय संस्थेची जमिनीवर कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, जमिन विक्रीसाठी सादर केलेल्या प्रस्तावातील शेतजमिन शासनाने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही, याची शेतजमिन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास जाणीव असल्याबाबतचे घोषणापत्र व जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत व सदर जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरू नसल्याबाबत व विक्री प्रस्तावातील जमिन कुठेही गहाण नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या जमिन मालकाचे शपथपत्र. जमिन विक्रीच्या अर्जावर शेतजमीन विक्री करणाऱ्या व्यक्तिशिवाय कुटुंबातील दोन व्यक्तिंच्या ( उदा. सख्खे भाऊ, पत्नी, मुले इत्यादी) स्वाक्षऱ्या असाव्यात व त्यांचे विक्रीबाबत ना-हरकत प्रमाणपत्र. विक्री करावयाची जमिन ही कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळची क्षारयुक्त व क्षारपाड असू नये.
अधिक माहितीसाठी इच्छुक जमिन मालकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली (दूरध्वनी क्रमांक 0233-2374739) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.