vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे

          नवी मुंबई प्रतिनिधी-  आपण जसे बोलतो तसे लिहिता आले पाहिजे म्हणजे इतरांना आपल्याला काय म्हणायचे आहे ते नेमकेपणाने कळेल असे सांगत लेखक, गज़लकार श्री. जनार्दन म्हात्रे यांनी विविध उदाहरणे देत उच्चारानुसार शब्दाक्षरे लिहिण्याच्या पध्दती सांगत मराठी शुद्धलेखनाचे धडे दिले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये आयोजित ‘अभिजात मराठीतील शुद्धलेखन’ या विषयावर श्री. जनार्दन म्हात्रे यांनी सादरीकरणाव्दारे उपस्थितांशी संवाद साधला.

        याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे व इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि नवी मुंबईकर रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.

            प्रत्येक अक्षराला स्वत:ची देहबोली असते असे स्पष्ट करीत परंपरेने आपण करीत असलेल्या भाषा लिखाणातील चुका सुधारण्यासाठी ही एक प्रकारची कार्यशाळा असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक भाषेला एक व्याकरण असते. ते भाषा शिकता शिकता सहज आत्मसात होत जाते. त्यामुळे शुद्धलेखन ही वेगळी प्रक्रिया नसून भाषा शिक्षणात त्यासोबत ओघाने होणारी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

            2022 मध्ये शुद्धलेखनाची नवी नियमावली लागू झाली आणि आपल्या बाराखडीमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ हे दोन स्वर नव्याने समाविष्ट झाले अशी माहिती देत लेखनातील नुक्त्याचे महत्व श्री. जनार्दन म्हात्रे यांनी विविध उदाहरणे देत सांगितले. अद्ययावत वर्णमालेची सविस्तर माहिती देताना भाषेचे उच्चार व्यवस्थित लिहिले जावेत हा आपला आग्रह असला पाहिजे असे ते म्हणाले. आजच्या एआय प्रभावित युगात संगणकीय लिखाण शुद्ध असले पाहिजे याची गरज सांगतांना एआय प्रणालीद्वारे महाजालात उपलब्ध माहितीमधून आपल्याला हवी ती माहिती उपलब्ध करुन घेता येते, त्यामुळे एआयमार्फत उपलब्ध होणारी माहिती लेखनाच्या दृष्टीने अशुद्ध नसावी या करीता आपण संगणकावर टंकलिखीत करीत असलेले मराठी लिखाण शुद्ध असणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शुद्धलेखनाचे महत्व सांगताना श्री. जनार्दन म्हात्रे यांनी संगणकीय फॉन्ट तसेच मराठी लेखनासाठी वापरले जाणारे किबोर्ड व सॉफ्टवेअर यांचीही सविस्तर माहिती दिली.

            याप्रसंगी बोलतांना अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी मराठी सौंदर्यवती भाषा असल्याचे सांगत दर कोसागणिक बोलीभाषा बदलते हे अनेक रंजक उदाहरणे देत दिलखुलास शैलीत सांगितले. मराठी भाषेचा अहंकार असावा मात्र इतर भाषांचा व्देश करु नये असे सांगताना त्यांनी दैनंदिन व्यवहारात अगदी फोनवर बोलतांनाही ‘हॅलो’ ने सुरुवात करण्याऐवजी ‘नमस्कार’ ने करावी असे सांगून अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मराठी भाषा नियमित वापरात जपू शकतो असे ते म्हणाले.

            महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजात मराठी भाषा सप्ताहात लोकसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यात येत असून उद्या दि. 08 ऑक्टोबर 2025 रोजी ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सभागृहात उपस्थित असणा-या श्रोत्यांना मराठी भाषा व साहित्य विषयक प्रश्न विचारले जाणार असून योग्य उत्तरे देणा-या रसिक श्रोत्यांना त्याच ठिकाणी पारितोषिक स्वरुपात वाचनीय पुस्तक दिले जाणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नसून दिघा ते बेलापूर या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक या स्पर्धेमध्ये बुधवार दि. 08 ऑक्टोबर 2025 रोजी सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात तिस-या मजल्यावरील ज्ञानकेंद्र सभागृहात सकाळी 11 वाजता उपस्थित राहून सहभागी होऊ शकतात. तरी या स्पर्धेमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

0000000

संबंधित पोस्ट

खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta