निवडणूक कामकाजविषयक आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतली नोडल अधिका-यांची आढावा बैठक
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26 ही दि. 15 जानेवारी 2026 रोजी होत असून 15 डिसेंबरपासून आचारसंहितेला सुरूवात झालेली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 72 तासांच्या कालावधीत अनाधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत आठ विभाग कार्यालय क्षेत्रात 72 तासात 1001 अनाधिकृत बॅनर्स, 578 कटआउुट / होर्डींग, 204 पोस्टर्स, 120 झेंडे व 84 भित्तीलेखन हटविण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मालमत्तांसह शासकीय कार्यालये व इमारती तसेच सार्वजनिक व खाजगी जागांवरील राजकीय मजकूरही हटविण्यात आलेला आहे. याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, निवडणूक उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे व इतर विभागप्रमुख नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक कामे विहित वेळेत पार पाडण्यासाठी विषयांरुप नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्याचा बाबनिहाय आढावा आयुक्त महोदयांनी घेतला.
कालच राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक विषयक कामकाजाची माहिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे आचार संहिता कालावधीत पाळावयाच्या नियमांचीही जाणीव करुन देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आचार संहितेचे पालन करण्यात येत असल्याबद्दल तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या सनियंत्रणाखाली आचार संहिताकक्ष व त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी निहाय गस्त पथके व चेकपोस्टची स्थायी पथके आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके स्थापन करण्यात आलेली असून त्याची कार्यवाही काटेकोरपणे करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस विभागाशी समन्वय राखून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या सनियंत्रणाखाली कामकाज होणार असून निवडणूक कालावधीत व मतदान या करिता सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे निवडणूकीकरीता उमेदवार व पक्ष यांच्यामार्फत देण्यात येणा-या जाहिरात साहित्य तपासणी व प्रमाणपत्र देणे तसेच प्रसार माध्यमांचे निरीक्षण करणे त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांना निवडणूक विषयक माहिती पुरविणे याकरिता मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे हे मिडीया सेल व एमसीएमसी समितीचे नोडल अधिकारी असून सदर कक्षाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. यावेळी चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने 28 प्रभागांपैकी 27 प्रभागांमध्ये एका मतदारास चार सदस्यांना मतदान करावयाचे आहे आणि एका 28 क्रमांकाच्या प्रभागामध्ये 3 सदस्यांना मतदान करावयाचे आहे. या अनुषंगाने मतदान कार्यपध्दतीबाबत व्यापक जनजागृती करण्याकरिता विविध प्रसार माध्यमांचा उपयोग केला जाणार असून मतदार जनजागृती कामाकरिता घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे हे नोडल अधिकारी आहेत
निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात ही कामे अत्यंत महत्वाची असून त्यानुसार तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासोबतच मतदान व मतमोजणी यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्व नियोजन करुन करण्यास तत्परतेने सुरुवात करावी व दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे सादर करावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. संभाव्य उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करतांना मालमत्ता कर, पाणीपट्टी व विविध विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे आवश्यक असून त्या दृष्टीने सर्वांच्या सुविधेकरिता प्रत्येक विभाग कार्यालयात एक खिडकी योजनेव्दारे एकाच ठिकाणी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध होतील याबाबत तत्पर कार्यवाही करावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे सभांना देण्यात येणा-या मैदानांची परवानगी विषयक कार्यवाहीदेखील सर्वांना समान न्याय या पध्दतीने करावी असे आयुक्तांनी सूचित केले. निवडणूक कामासाठी मतदान व मतमोजणी करीता 6275 कर्मचा-यांची आवश्यकता असून ते उपलब्ध् करुन घेण्यासाठी गतीमान कार्यवाही करण्याच्या सूचना मनुष्यबळ व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी असणा-या प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे यांना देण्यात आल्या. सर्व मतदान केंद्रे व निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये जिओ टॅगिंग करुन घ्यावीत जेणेकरुन त्यांचे स्थळ सर्वांनाच लगेच समजेल असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूकविषयक विविध कामांकरिता नियुक्त नोडल अधिकारी यांच्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.