
मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे-‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश
सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहीम हाती घ्यावी. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचा दृष्टीने लिंग समानतेबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.
‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) सोमनाथ रसाळ, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, ॲड. जयंत नवले आदि उपस्थित होते.
जिल्ह्यात माता मृत्यू दर रोखण्यात यश येत आहे. मात्र, अर्भक मृत्यू दर रोखणे व मुलींचा जन्मदर वाढवणे हे आव्हान आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या आव्हानावर मात करण्यासाठी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाने परस्पर समन्वय ठेऊन अधिकाधिक जनजागृती उपक्रम हाती घ्यावेत. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी यासाठी अधिक जागरूकतेने काम करावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी, बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई आणि व्यापक जनजागृती ही त्रिसूत्री ठेवून काम करण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच, समाजातील चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि ग्रामस्तरावर जनजागृती कार्यक्रम राबवावेत. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
भावी पिढी सदृढ जन्माला यावी, यासाठी अंगणवाडी सेविकांनी गर्भवती महिलांच्या संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रयत्न करावेत. बऱ्याच महिला गर्भारपणाच्या सातव्या महिन्यात प्रसूतीसाठी माहेरी जातात. अशावेळी अंगणवाडी सेविकांनी संबंधित महिलेची अधिक माहिती घेऊन, तिच्या माहेरच्या गावच्या अंगणवाडी सेविकेशी समन्वय ठेवावा. तसेच, अंगणवाडीच्या परसबागेत जिजाऊ, ताराराणी, लक्ष्मीबाई आणि सावित्रीबाई यांच्या नावाने शेवग्याच्या चार झाडांचे वृक्षारोपण केल्यास पोषणाच्या दृष्टीने याचा अंगणवाडीतील मुले व गर्भवती महिलांना लाभ होईल, असे ते म्हणाले.हुंडामुक्ती अभियान हे चाकोरीबाहेरचे अभियान यशस्वी केल्याबद्दल महिला व बालविकास विभागाचे अभिनंदन करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, अशा जनजागृतीतून समाजाच्या मानसिकतेत बदल होत असतो. आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांनी परस्पर समन्वयाने हुंडामुक्तीप्रमाणेच मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात लिंग निदानासाठी सोनोग्राफी केली जाणार नाही, यासाठी काम करावे. स्रीगर्भपात रोखण्यासाठी निश्चय करावा, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात सोमनाथ रसाळ यांनी शासनाचे विविध संदेश तळागाळात पोहोचवणारे खरे योजनादूत अंगणवाडी सेविका आहेत. त्यांनी विविध योजनांची माहिती यशस्वीपणे ग्रामीण भागात दिली आहे. यशोदामाता अंगत पंगत, हुंडामुक्ती अभियान याप्रमाणेच बेटी बचाओ, बेटी पढाओ हेही अभियान यशस्वी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.या बैठकीस समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
000000000000



