
भाजपा जालना महानगर च्या वतीने महाप्रशिक्षण अभियान अंतर्गत निवासी प्रशिक्षण वर्ग संपन्न
जालना (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीतील मौलाचा दगड ठरणाऱ्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान-२०२६’ अंतर्गत भाजपा जालना महानगरातील नवीन जालना, जुना जालना, पूर्व जालना व ग्रामीण मंडळांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग ‘साई लॉन्स, मंठा रोड, राममूर्ती जालना’ येथे नुकतेच संपन्न झाले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या वर्गाचे उदघाटन भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले, तर समारोप माजी मंत्री आ. बबनरावजी लोणीकर यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, मंत्री आ. बबनरावजी लोणीकर, आ.भगवानदास सबनानी, जालना ग्रा.जिल्हाध्यक्ष आ.नारायणभाऊ कुचे, माजी आ.कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निवासी वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी दोन दिवस एकत्र राहून पक्षाची विचारधारा आणि कार्यपद्धती समजून घेतली. उदघाटन प्रसंगी बोलताना रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, “भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून विचारांनी प्रेरित असलेले कुटुंब आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या क्षेत्रातील विकासकामांची अचूक माहिती ठेवून जनतेसमोर मांडली पाहिजे. संघटन मजबूत करण्यासाठी केवळ वरच्या पातळीवरचे नेतृत्व पुरेसे नसते, तर तळागाळातील कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी हा अंत्योदयाचा विचार जपणारा पक्ष असून केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे. ज्याचा बूथ मजबूत, त्याचा विजय निश्चित, हा मंत्र लक्षात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने ‘योजना दूत’ बनून काम करावे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला विकासकामांच्या आकडेवारीने चोख उत्तर द्यावे.
या प्रशिक्षण वर्गात माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनीही वैचारिक आणि राजकीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात राजकारणातील बदलते स्वरूप, मतदारांच्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आजचा मतदार अधिक जागरूक झाला आहे. तो केवळ घोषणांवर विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष काम आणि परिणाम पाहतो. गाव, वॉर्ड आणि बूथ स्तरावर सक्रिय कार्यकर्ते असतील तर कोणतीही निवडणूक जिंकणे शक्य होते. प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील सर्व घटकांशी संवाद वाढवून विश्वास निर्माण केला पाहिजे.”
महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी आपल्या भाषणात संघटनात्मक मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. ते म्हणाले की, “भाजप ही केवळ राजकीय पक्ष नसून विचार आणि कार्यपद्धतीवर चालणारी संघटना आहे. आगामी काळात प्रत्येक बूथ हा आपला सर्वात मजबूत किल्ला असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक बूथवर सक्षम आणि सक्रिय बी.एल.ए. (BLA) नेमणे अत्यावश्यक आहे. मतदार यादीचे पुनरावलोकन (SIR) हे फक्त कागदोपत्री काम नसून ते संघटन विस्ताराचे सर्वात प्रभावी साधन आहे.” ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथमधील प्रत्येक मतदाराशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन मतदारांची नोंदणी, वगळलेल्या नावांची तपासणी आणि घराघरात जाऊन योजनांची माहिती देणे ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे. डिजिटल माध्यमांचा वापर करून संघटन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.



