
विशेष लेख-बुलढाणा जिल्हा: महसूल प्रशासन आणि डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय
बुलढाणा जिल्ह्याने सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात महसूल प्रशासन, ई-गव्हर्नन्स आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाखाली जिल्ह्याने केवळ निर्धारित महसुली उद्दिष्टेच पार केली नाहीत, तर ‘प्रशासनाचा आरसा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल डॅशबोर्डच्या माध्यमातून पारदर्शकतेचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. जिल्ह्याने एकूण १३,६४९.४७ लाख रुपयांच्या महसूल वसुलीच्या लक्षासमोर १६,१०१.७५ लाख रुपयांची वसुली करून ११७.९७% यश संपादन केले आहे. यामध्ये संग्रामपूर तालुक्याने १५२.४९% वसुलीसह जिल्ह्यात ऐतिहासिक आघाडी घेतली असून, जळगाव जामोद आणि खामगाव या तालुक्यांनीही उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशेष म्हणजे जमीन महसूल आणि गौण खनिज या दोन्ही प्रमुख लेखाशीर्षांत जिल्ह्याने ११७.९७% पेक्षा जास्त वसुलीची नोंद केली असून, गौण खनिज विभागात ११९% हून अधिक वसुली झाली आहे.
डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात ई चावडी प्रणाली महसूल वसुलीमध्ये बुलढाणा जिल्ह्याने राज्यात दुसऱ्या क्रमांकाची झेप घेतली आहे. ई-महसूल प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे १७,२५० अर्जांपैकी केवळ ०.४% अर्ज प्रलंबित असून, प्रशासकीय गतीमानता सिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील फेरफार प्रकरणांचा निपटारा सरासरी १३ ते १८ दिवसांत केला जात असून, ९४% पेक्षा अधिक प्रकरणांचा यशस्वी निकाल लावण्यात आला आहे. नागरिकांना तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महसूल मित्र हा एआय आधारित WhatsApp चॅटबॉट कार्यान्वित करण्यात आला आहे, ज्याद्वारे ७/१२ उतारा, ई-मोजणी आणि इतर महसुली सेवांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहे. ‘सहज प्रणाली’ अंतर्गत सन १८५० पासूनचे २ कोटींहून अधिक ऐतिहासिक दस्तऐवज १६ टीबी क्लाउड स्टोरेजवर जतन करण्यात आले असून, मोडी लिपीतील कागदपत्रांचे जेमिनी एआय (Gemini AI) द्वारे मराठीत भाषांतर करण्याची आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.



