
दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईतील लोकल : रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क,
मुंबई : प्रतिनिधी सहा दहशतवाद्यांच्या चौकशीत मुंबईची लोकल रडारवर असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आज रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) तातडीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून जागोजागी श्वान पथक, बॉम्बशोधक आणि निकामी पथकाद्वारे पाहणी सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच एटीएसने पत्रकार परिषद घेत दहशतवादी कटाबाबत माहिती दिली.महिलांच्या सुरक्षेत वाढ रेल्वे परिसरात वारंवार महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे गस्तीचे प्रमाण आणि सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यावर चर्चा झाली. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी भर दिला जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह पोलिस आणि इतर सुरक्षा विभाग सतर्क झाले आहेत. श्वान पथक, बॉम्बशोधक आणि निकामी पथकाद्वारे तापसणी सुरू आहे. स्थानकावरील हमाल आणि बूट पॉलिश करणाऱ्यांना संशयित हालचाली दिसल्यास माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा: ठाण्यात ५८० दुकानांमध्ये बेकायदा मांसविक्री
जानला कोटाहून अटकजान मोहम्मद शेख धारावीतील एम. जी रोड कालाबखार परिसरात राहत होता. त्याला पूर्वी अमली पदार्थ सेवनाचे व्यसन होते. वाहनचालक आणि डिलिव्हरी बॉय म्हणून त्याने काम केले आहे. ९ सप्टेंबरला उत्तर प्रदेशला आपल्या मित्रांसोबत तो जाणार होता. त्याबाबत त्याने पत्नीलाही माहिती दिली होती. मात्र, अचानक उत्तर प्रदेशात जाण्यामागचा त्याचा हेतू स्पष्ट झाला नाही. पत्नीला त्याच्यावर संशय होता. त्यामुळे त्याने तिला उत्तर प्रदेशचे तिकीटही दाखवले होते. जानचे तिकीट १३ सप्टेंबरला कन्फर्म झाले. त्यानंतर तो गोल्डन टेम्पल एक्सप्रेसमधून जाण्यासाठी निघाला. प्रवासादरम्यान तो राजस्थानच्या कोटा इथे पोहचल्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. जानचे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का, त्याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



