
पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
नांदेड प्रतिनिधी:- पाणी फाउंडेशन अंतर्गत आयोजित “सत्यमेव जयते फार्मर्स कप स्पर्धा 2026” जिल्हास्तरीय कार्यशाळा व मार्गदर्शन सत्र जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडले.नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या या उपक्रमाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी समाधान व्यक्त केले. सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक गावामध्ये लोकसहभाग वाढवून हा उपक्रम जनआंदोलनाच्या स्वरूपात राबविण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासन, कृषी विभाग, स्वयंसेवी संस्था व ग्रामस्तरावर नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास नांदेड जिल्हा राज्यामध्ये आदर्श निर्माण करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेस पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड/देगलूर/किनवट, सर्व तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM/ATM), फार्मर्स कप स्पर्धेसाठी नियुक्त कृषी मेंटर्स, कृषी विभागाचे उपक्रम अधिकारी, सर्व NRM समन्वयक, समूह सहाय्यक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रतिनिधी, तालुका अभियान व्यवस्थापक, अभियान कक्ष अधिकारी, HIMWP-MH AGVSS कंधार, WOTR लोहा तसेच RAES किनवट येथील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होतेया मार्गदर्शन सत्रामध्ये “सत्यमेव जयते फार्मर्स कप स्पर्धा 2026” ही केवळ स्पर्धा नसून गाव विकास, जलसंधारण, नैसर्गिक शेती आणि सामूहिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ असल्याचे अधोरेखित करण्यात आले. गाव पातळीवर शेतकऱ्यांना एकत्र आणून गट बांधणी कशी करावी. गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग कसा वाढवावा. तसेच स्पर्धेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक नेतृत्व व समन्वयाचे महत्व काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. अविनाश पोळ यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शनातून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना सामूहिक उद्दिष्टासाठी एकत्र आणणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. त्यांनी नैसर्गिक शेती, गट शेती, पाणी व्यवस्थापन, मृदसंवर्धन आणि लोकसहभाग या घटकांचा परस्पर संबंध स्पष्ट करत अनेक यशस्वी उदाहरणांद्वारे उपस्थितांना प्रेरित केले. शाश्वत शेती व्यवस्थेकडे वाटचाल करताना उत्पादन खर्च कमी करून पर्यावरणपूरक शेती पद्धती स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी शेतकरी केंद्रित नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि वेळोवेळी आढावा घेण्याचे महत्व स्पष्ट केले. उपस्थित अधिकाऱ्यांना गावागावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे व स्पर्धेचा उद्देश प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले.
हे मार्गदर्शन सत्र अत्यंत परिणामकारक, प्रेरणादायी व दिशादर्शक ठरले. उपस्थित सर्व अधिकारी, समन्वयक व प्रतिनिधींना या माध्यमातून आगामी कामकाजासाठी स्पष्ट दिशा, नवीन ऊर्जा व सकारात्मक प्रेरणा मिळाली. नांदेड जिल्ह्यात “सत्यमेव जयते फार्मर्स कप स्पर्धा 2026” अधिक प्रभावीपणे राबवून गाव विकास, जलसंधारण व शाश्वत शेतीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले जात असल्याचे या बैठकीतून स्पष्टपणे दिसून आले.
सदर जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण पाणी फॉउंडेशन टीमने उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम अत्यंत प्रभावी, शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पाडला.
000000



