vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील  उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षणाकरिता नागरिकांनी सहकार्य करावे

नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील

उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षणाकरिता नागरिकांनी सहकार्य करावे

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग यांच्याद्वारे प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येत आहे. याकरिता रायगड जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या घटकांच्या सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना सर्व संबंधित कुटुंबीयांनी सहकार्य करावे असे आवाहन उपआयुक्त, जिल्हा सांख्यिकी कार्यालय रायगड यांनी केले आहे.

या सर्वेक्षणाच्या क्षेत्रीय कामासाठी नियुक्त केलेल्या अन्वेषक व पर्यवेक्षक यांची पुणे व कोकण विभागाची विभागीय प्रशिक्षण कार्यशाळा दि.05 जून ते 10 जून 2026 या कालावधीत आयोजित केली असून या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा दि. 05 जून 2026 रोजी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे येथे आयुक्त, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई डॉ.ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते संपन्न झाला.

या उद्घाटन समारंभास सहसंचालक, NSO-FOD, पुणे डॉ.रुही कुलकर्णी, सहआयुक्त, प्रादेशिक कार्यालय, कोकण जयसिंग मेहेत्रे, सहआयुक्त, मुख्य कार्यालय, मुंबई भीष्म बिरादार, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे संजय मरकळे, सहआयुक्त, प्रादेशिक कार्यालय, पुणे श्रीमती वृषाली माकर, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, पुणे किरण इंदलकर, उप आयुक्त, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे श्रीमती प्रियांका बोकील, सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अशोक कुमार टोपराणी, व IPSOS संस्थेचे श्रीमती तृप्ती शर्मा संचालक उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा प्र.जिल्हाधिकारी, पुणे गजानन पाटील यांनी ऑनलाईन व्हीडीओ फीत द्वारे नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) ही महत्वाची सर्वेक्षणे असून या सर्वेक्षणामधुन प्राप्त होणारी आकडेवारी ग्रामपातळीवर, जिल्हा आणि विभागस्तरावरील कल्याणकारी योजना व धोरण निर्मितीसाठी खुप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व प्रगणकांनी आकडेवारी गोळा करताना दक्षता घ्यावी तसेच सर्व नागरीकांनी अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असे आवाहन केले.

विकसित भारत @ 2047 चे ध्येय पूर्ण करण्यासाठी अचूक व अद्ययावत माहिती अत्यावश्यक आहे. तसेच एव्हिडन्स बेस्ड डेटा चा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनास उपयोग होतो. त्यामुळे हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणापूरते मर्यादित नसून नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) सर्वेक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक मजबूत पाया घालणारी महत्वपूर्ण प्रक्रीया आहे असे डॉ.रुही कुलकर्णी, सहसंचालक, NSO-FOD, पुणे यांनी सांगितले. तसेच सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक टोपराणी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मोजमापामध्ये या दोन्ही सर्वेक्षणाचे अनन्य महत्व असल्याचे सांगितले.

विकसित भारत @ 2047 नुसार जिल्हा हे विकासाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्याकरीता जिल्हास्तरीय रोजगार-बेरोजगार आकडेवारी, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या तसेच रोजगार निर्मिती इत्यादी निर्देशकांची सविस्तर सांख्यिकीय माहिती आवश्यक आहे. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे निर्माण होणारी सांख्यिकीय माहिती वेगवेगळ्या निर्देशकांद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास उपयुक्त होईल. शासनाच्या विविध योजना आखण्यात, वेगवेगळ्या क्षेत्रातील धोरणे निश्चित करण्यात या दोन्ही सर्वेक्षणाांचे अनन्य साधारण महत्त्व आहे, असे डॉ. ज्योत्स्ना पडियार आयुक्त, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई यांनी विषद केले.

या पाच दिवसीय प्रशिक्षणास Ipsos Research Pvt. Ltd. Mumbai या बाह्यसंस्थेकडून नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना PLFS सर्वेक्षणांतर्गत रोजगार-बेरोजगारीची स्थिति, कामगार सहभाग दर, उद्योग व व्यवसायनिहाय

 रोजगाराची रचना याबाबत तसेच ASUSE सर्वेक्षणांतर्गत असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या, स्वरुप, आर्थिक स्थिति, रोजगारनिर्मिती व उत्पन्न खर्च यासंबंधी माहिती संकलनाच्या संकल्पना, व्याख्या व CAPI तंत्रज्ञानाद्वारे Tablet वर माहिती नोंदणीचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यामध्ये PLFS आणि ASUSE सर्वेक्षणांतर्गत एकूण 6 हजार 828 इतके नमुना घटक असून 276 अन्वेषक व निरीक्षक यांच्याद्वारे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे व कोकण विभागात PLFS व ASUSE या दोन्ही सर्वेक्षणांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण 2 हजार 956 नमुना घटकांचे सर्वेक्षण होणार आहे व हे सर्वेक्षण 75 अन्वेषक आणि 28 पर्यवेक्षक यांच्या टीमद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयसिंग मेहेत्रे, सहआयुक्त, प्रादेशिक कार्यालय, कोकण यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वृषाली माकर, प्र. सहआयुक्त, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी केले.

0000000

संबंधित पोस्ट

विचाराधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा विधी साहाय्य उपक्रम· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरु असलेला उपक्रम

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना,महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली छायापत्रकारितेच्या क्षेत्रातील मनस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो