vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पाणी बचत व पर्यायी पाण्याच्या प्रभावी वापराबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन*

पाणी बचत व पर्यायी पाण्याच्या प्रभावी वापराबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन*

नवी मुंबई प्रतिनिधी -भारतीय हवामान विभागाने (IMD) अल-निनोच्या प्रभावामुळे जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीतील नैऋत्य मान्सून पावसाचा दीर्घकालीन अंदाज प्रसिद्ध केला आहे. या अंदाजानुसार देशातील हंगामी पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना याबाबत नागरिकांना अवगत केले होते.

त्यास अनुसरून आयुक्त महोदयांनी पाणी बचतीबाबत पाणी पुरवठा विभागाने अंमलबजावणी केलेल्या उपाययोजनांचा रविवारी 28 जून रोजी सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) श्री.शंकर जाधव तसेच पाणीपुरवठा विभागातील सर्व उपअभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सर्व विभागांतील सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्ती कंत्राटदार उपस्थित होते.

सद्यस्थितीत दि.28 जून पर्यंत मोरबे धरणामध्ये केवळ 17.863 द.ल.घ.मी. (9.36%) इतके पिण्यायोग्य पाणी शिल्लक आहे. सदर उपलब्ध जलसाठा किमान 31 ऑगस्टपर्यंत पुरविणे व पुढील वर्षीच्या ऑगस्ट – २०२७ पर्यंत उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन, नवी मुंबई शहरातील उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर, शाश्वत व कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच करण्यात आलेली 10 % पाणीकपात व दैनंदिन पाणी वापरामुळे मोरबे धरणातील जलसाठ्याचे सातत्याने कमी होणारे प्रमाण या अनुषंगाने पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत व प्रभावी उपाययोजनांबाबत चर्चा करीत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले. यामध्ये –

• गृहनिर्माण संस्थेतील सर्व पदाधिकारी / नागरिक यांना पाणी बचतीबाबत व मोरबे धरणातील उपलब्ध जलसाठ्याबाबत नियमितपणे अवगत करावे, जेणेकरून त्यांना सद्यस्थितीची कल्पना राहील अशा सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, • पाणीपुरवठ्याबाबत विभाग स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने सूक्ष्म जलनियोजन कृती आराखडा तयार करावा आणि कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), उपअभियंता, सहाय्यकअभियंता, कनिष्ठ अभियंता व संबंधित क्षेत्रातील सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्ती कंत्राटदार यांनी तो काटेकोरपणे अंमलात आणावा.• महानगरपालिकेमार्फत गृहनिर्माण संस्थेला होणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा उपलब्ध जलसाठ्यानुसार होत असल्याने, त्यामध्ये वारंवार कपात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महानगरपालिकेमार्फत गृहनिर्माण संस्थेला होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा काळजीपूर्वक व प्रभावीपणे वापर करणेबाबत संबंधितांना सूचित करावे असेही निर्देश देण्यात आले.

• गृहनिर्माण संस्थेतील पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी, जलतरण तलाव, बागा तसेच वाहन धुणे इ. करिता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्काळ बंद झाला आहे याची तपासणी करून खातरजमा करण्यात यावी.

• महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व विहिरी व बोअरवेल्स (Tube Wells) यांची तातडीने पुढील पाच दिवसांत सलग स्वच्छता करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. त्या सदर ठिकाणी आवश्यकतेनुसार आर. ओ. (R.O.) प्रणाली बसवून तसेच सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी कार्यक्षम पंपिंग प्रणाली (Dual Operation Pumping System) कार्यान्वित करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आल• व्यावसायिक व वाणिज्यिक ग्राहकांना यापूर्वीच २० % पाणीकपात करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनांकडून पाणीकपात होत असल्याबाबत तपासणी करून खातरजमा करण्यात यावी. आणि तसे केल्याचे न आढळल्यास संबंधित आस्थापनांना नोटीस देऊन त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करणेत यावी असेही स्पष्ट करण्यात आले.• नवी मुंबई शहरात, पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी अथवा अनधिकृतरित्या पाण्याचा वापर होत असल्याबाबत आढळून आल्यास जागरूक नागरिकांनी त्याबाबत आपल्या संबंधित विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाकडे अथवा टोल फ्री क्रमांक 1800222309 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात यावे तसेच अशा प्राप्त तक्रारींवर पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीने कारवाई करून संबंधितास आश्वस्त करावे असेही आयुक्त महोदयांनी निर्देशित केले.

प्रक्रियाकृत सांडपाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी अधिक कृतीशील होण्याचे आयुक्तांचे निर्देश• सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे 52.50 द.ल.लि. इतके तृतीय स्तरीय प्रक्रियाकृत सांडपाणी उपलब्ध आहे. या पाण्याचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी सर्व विभागनिहाय कृती आराखडा महानगरपालिकेमार्फत तयार करावा. त्यानुसार प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात टँकरद्वारे प्रक्रियाकृत सांडपाणी पुरवठा करण्यासाठी टँकर फिलिंग पॉइंट्स विकसित करावेत असे निर्देश आयुक्त महोदयांनी यावेळी दिले.• हे तृतीयस्तरीय प्रक्रियाकृत सांडपाणी सर्व बांधकामधारक तसेच मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील उद्याने यांना आवश्यकतेनुसार त्यांच्या स्वतःच्या वाहनाव्दारे / टँकरद्वारे उपलब्ध करून दिले जाईल, याबाबत व्यापक जनजागृती करावी असेही सूचित करण्यात आले.

• महानगरपालिकेमार्फत सर्व सार्वजनिक शौचालये व सामुदायिक शौचालयांसाठी तृतीयस्तरीय प्रक्रियाकृत सांडपाणी / पुनरुज्जीवित विहिरींमधील अथवा बोअरवेल्स मधील पाण्याचा १०० % वापर करण्यात यावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.हवामान बदल आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे जलस्रोतांवर वाढणारा ताण लक्षात घेऊन, आजपासूनच पाणीबचत करण्यासोबतच पर्यायी पाणी स्त्रोतांचा प्रभावी वापर करणेबाबत आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढविणेसाठी प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे हे लक्षात घेत नागरिक, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि सर्व संबंधित घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून पाण्याचा जबाबदारीने वापर करावा असे आवाहन करतानाच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पाण्याची सद्यस्थिती व त्याबाबत घ्यावयाची काळजी ही बाब नागरिकांच्या मनात रुजविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत सर्व संबंधितांनी सर्वतोपरी काटेकोरपणे प्रयत्न करावेत असे निर्देश दिले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

जाहीरात विषयक जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री गोरे यांच्याकडून जगजीवन राम झोपडपट्टीची पाहणी व मृत शालेय विद्यार्थ्यांनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन

अवैध गौणखनिजाच्या उत्खनन, वाहतुकीवर प्रशासनाची कारवाई*एक कोटी 43 लक्ष दंडाची वसूली

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन

सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त कर्मचाऱ्यांना दिलासा अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित- सचिव तुकाराम मुंढे

vishwatmaklokswamivarta