येवला व निफाड तालुक्यातील पीक परिस्थितीचा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा निफाड तालुक्यात पडलेल्या पावसाच्या खंडाची फेरपडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा
येवला व निफाड तालुक्यातील पीक परिस्थितीचा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा निफाड तालुक्यात पडलेल्या पावसाच्या खंडाची फेरपडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा
येवला, प्रतिनिधी : शासनाने जाहीर केलेल्या ट्रिगर-१ तालुक्यात निफाड तालुक्याचा समावेश नाही. या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील पर्जन्यमान, पावसाचा खंड, पिकांची प्रत्यक्ष स्थिती व उत्पादनातील संभाव्य घट याची तातडीने फेरपडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा. तसेच येवला व निफाड तालुक्यातील परिस्थितीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी पीक कापणी प्रयोग प्रभावीपणे राबवावेत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.येवला मतदारसंघातील पीक परिस्थिती व दुष्काळसदृश परिस्थितीबाबत येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी महसूल, कृषी, जलसंपदा, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, महावितरण तसेच संबंधित विभागांकडून सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, मुख्याधिकारी तुषार आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी बटू पाटील, तहसीलदार (येवला) आबा महाजन, तहसीलदार (निफाड) विशाल नाईकवाडी, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, निफाड तालुक्यातील देवगाव, विंचूर, लासलगाव व नांदूरमध्यमेश्वर या मंडळांमध्ये पावसाचा खंड आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम याची प्रत्यक्ष पाहणी करावी. पर्जन्यमानाची नोंद, पावसातील खंड, पिकांचे नुकसान व उत्पादनातील घट याबाबत अचूक आकडेवारी संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करावा**.**
पीक कापणी प्रयोगात वस्तुनिष्ठता राखावी.येवला व निफाड तालुक्यातील पिकांच्या प्रत्यक्ष उत्पादनाचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी पीक कापणी प्रयोग निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावेत. प्रयोगासाठी प्लॉटची निवड करताना विशेष दक्षता घ्यावी. सिंचनाची सुविधा किंवा पाटचाऱ्याच्या लगतची जमीन निवडल्यामुळे प्रत्यक्ष पीक परिस्थितीचे चुकीचे चित्र निर्माण होणार नाही, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी. पावसाचा सर्वाधिक खंड पडलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त पडताळणी करावी, असे त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम २०२६ मध्ये प्रथम कळ लागू झालेल्या येवला तालुक्यात शासनाच्या निर्देशानुसार विविध सवलती व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात नियमानुसार सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांमध्ये शिथिलता यांचा पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळेल, याची दक्षता घ्यावी. सरसकट पीक नुकसानीचे पंचनामे, ई-पीक पाहणी, पीक विमा दावे आणि संबंधित शासकीय मदतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. कोणताही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महसूल व कृषी विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
येवला व निफाड तालुक्यातील धरणे, तलाव, बंधारे, विहिरी, बोअरवेल व अन्य जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील काळातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. संभाव्य पाणीटंचाईची गावे आतापासून निश्चित करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे जनजागृतीपर आवाहन करावे. टँकरसाठी पाण्याचे स्रोत, फेऱ्या व वितरण व्यवस्था निश्चित ठेवावी. पशुधनासाठी उपलब्ध चारा व पाण्याची स्थिती तपासून आगामी काळातील संभाव्य गरज लक्षात घेऊन चारा डेपो व अन्य उपाययोजनांचे आगाऊ नियोजन करावे. पशुवैद्यकीय सेवा आणि लसीकरणाची कार्यवाही प्रभावीपणे राबवावी. वनविभागाने वन्यजीवांसाठी पाण्याचे साठे अद्ययावत ठेवावे. रास्त भाव दुकानातून धान्य पुरवठा सुरळीत ठेवावा
उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करावे. गहू, हरभरा, कांदा व कमी पाणी लागणाऱ्या पिकांसाठी आवश्यक बियाणे, खते व इतर निविष्ठांचा पुरेसा साठा आगाऊ उपलब्ध करून द्यावा. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन द्यावे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाण्याची उपलब्धता, लागवड क्षेत्र, साठवणूक व्यवस्था व बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक नियोजन करावे. शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी करण्यात यावी.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगाराची मागणी करणाऱ्या पात्र कुटुंबांना वेळेत रोजगार उपलब्ध करून द्यावा. पुढील तीन महिन्यांचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करून जलसंधारण, मृदसंधारण आणि पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या गावांमध्ये रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, असेही त्यांनी सांगितले. शेती पंपांची वीज जोडणी, थकीत वीजबिलामुळे खंडित झालेल्या जोडण्या, पीक कर्ज पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती याबाबत शासन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कोटमगाव येथील ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जगदंबा देवी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक, पाणी, आरोग्य, स्वच्छता, वीज व अग्निसुरक्षा याबाबत आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करावी. उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन विभागनिहाय जबाबदाऱ्या व कालमर्यादा निश्चित करून कृती आराखडा तयार करावा. तसेच १३ ऑक्टोबर रोजी येवला येथे होणाऱ्या मुक्तीदिन कार्यक्रमासाठीही मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या दृष्टीने वाहतूक, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेचे सर्वंकष नियोजन करावे. कार्यक्रमाच्या दिवशी अडचणी निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा पूर्वतयारीला प्राधान्य देऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.