
दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन
मुंबई, प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये दहा दिवसांत सुमारे २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे भाविकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.



