vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही

पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे-नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी) : पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय आत्मसात करावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातील नवलादेवी वाडी येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसातील खंडामुळे शेतीवर झालेल्या परिणामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी लक्ष्मण विठोबा हिवाळकर यांच्या शेतातील भातशेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी यावेळी पावसाअभावी भातपिकाच्या वाढीवर झालेल्या परिणामांची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे भातपिकाला अपेक्षित फुटवे आलेले नाहीत. तसेच भाताचे दाणेही पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याचे शेतकरी लक्ष्मण हिवाळकर यांनी सांगितले. पावसातील खंडाचा परिणाम तालुक्यातील ऊस पिकावरही झाला असून उसाच्या शेतीचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकणात भाताच्या विविध जातींसह उसाच्या शेतीची अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. जुने जाणकार शेतकरीही याची जाणीव करून देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद आणि अनुभवाच्या आधारे मिळालेली माहिती शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविली जाईल. केवळ उपलब्ध आकडेवारी किंवा गुगल मॅपच्या आधारे नव्हे, तर प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची स्पष्ट भूमिका घेतली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याची वस्तुस्थिती शासनासमोर भक्कमपणे मांडून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, सध्याची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची आणि पाण्याचे नियोजन करण्याची सवय आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. गावपातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाणी अडविणे आणि त्याचा काटकसरीने वापर यासाठी स्थानिक पातळीवरही प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पावसातील खंडामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री राणे यांनी दिली. ट्रिगर-१ अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या सवलती आणि उपाययोजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, सरपंच लिना पांचाळ, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, पंचायत समिती सदस्य साधना नकाशे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील तसेच जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

०००००००

संबंधित पोस्ट

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवारी धरणे व निदर्शने आंदोलन

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते कामांचा १५ दिवसात अहवाल सादर करा – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे विलंब व दफ्तरदिरंगाईस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई

मलकापूरमध्ये स्टेट बॅंकेची नवीन फॉरेक्स शाखा,उद्योजक, निर्यातदारांना दिलासा ; अकोल्याच्या चकरा थांबणार

vishwatmaklokswamivarta

कर्जतच्या भालिवडीत ​कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा जागर*श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार”*

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta