
ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यानच्या नवीन स्थानकासाठीचा निधी रेल्वे बोर्डाने तातडीने वर्ग करावा रत्नागिरी- दादर पॅसेंजर पूर्ववत करा, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करा,कोकण रेल्वेवर नवीन ट्रेन सुरु करा, मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करा गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त गाड्या सोडा.. खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा
नवी दिल्ली – प्रतिनिधी लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो तातडीने रेल्वे बोर्डाने वितरीत करावा, अशी प्रमुख मागणी आज खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली. तसेच रत्नागिरी- दादर पॅसेंजर पूर्ववत करावी, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करावा, कोकण रेल्वेवर नवीन ट्रेन सुरु करावी, मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करुन आठवड्यात ६ दिवस सुरु ठेवावी, गणेशोत्सवासाठी जास्तीतजास्त गाड्या सोडाव्यात अशा मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन केल्या.
खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. काही काळ हे काम संथ गतीने सुरु होते. या कामासाठी २५० कोटींचा निधी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. मात्र हा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग करण्यात आला नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ निधी वर्ग करण्याची विनंती केली. अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवत निधी तात्काळ वर्ग करण्याची मागणी मान्य केली.
पूर्वी धावणारी गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी कोकण विभागातील कष्टकरी, रोजचे प्रवासी, छोटे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना थेट मुंबईशी जोडणारी एक प्रमुख ‘जीवनरेखा’ होती. तथापि, कोविड-19 महामारीमुळे, ही ट्रेन दादरऐवजी दिवा स्टेशनपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दिवा स्टेशनवरील मर्यादित प्लॅटफॉर्म क्षमता आणि पाणी भरण्याच्या समस्येमुळे, ट्रेनला पनवेल येथे बराच वेळ थांबावे लागते, ज्यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो. शिवाय, पुढील प्रवासासाठी त्यांना दिवा स्टेशनवरून गर्दीच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करावा लागतो. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे ट्रेन क्रमांक ५०१०३/ ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोविड-19 महामारीपूर्वी जशी धावत होती, तशीच पुन्हा दादर स्टेशनपर्यंत धावली पाहिजे. प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि रेल्वे संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी, गाडी क्रमांक १०१०५/१०१०६ दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पर्यंत करण्यात यावा अथवा तांत्रिक कारणांमुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करणे शक्य नसल्यास, मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान एक नवीन दैनिक गाडी तात्काळ सुरू करावी, जी सर्व स्थानकांवर (दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, इत्यादी) थांबेल, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.



