
*प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिरांचा लाभ घ्या**सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बीएलओ राहणार उपस्थित**नवमतदारांसह पात्र नागरिकांना नाव नोंदणी, दुरुस्ती व वगळणीची संधी*
सातारा प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत मतदार यादीत नवीन नाव नोंदविणे, अस्तित्वातील नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच अपात्र किंवा आवश्यकतेनुसार नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे
विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये विविध कारणांमुळे काही मतदारांची नावे समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करून घेण्याची संधी या दावे व हरकतींच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहे
याशिवाय १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणीबरोबरच मतदार यादीतील विद्यमान नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती, तसेच नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक तसेच इतर पात्र नागरिकांचा मतदार यादीतील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
विशेष शिबिरांसाठी नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संबंधित मतदान केंद्रावर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव तपासून, आवश्यक असल्यास नवीन नोंदणी अथवा दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रावरील विशेष शिबिरात अर्ज करावा. या संधीचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
०००००



