vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांच्या जीवनात जातीच्या दाखल्यांमुळे सकारात्मक परिवर्तन – अप्पर मुख्य सचिव विकास खारगे- भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण – पाणंद रस्ते खुले केल्याबद्दल शिष्टमंडळाने व्यक्त केली कृतज्ञता..

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांच्या जीवनात जातीच्या दाखल्यांमुळे सकारात्मक परिवर्तन – अप्पर मुख्य सचिव विकास खारगे- भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण – पाणंद रस्ते खुले केल्याबद्दल शिष्टमंडळाने व्यक्त केली कृतज्ञता..

सांगली, प्रतिनिधी : भटक्या समाजातील विद्यार्थी व नागरिकांना जातीच्या दाखले वितरणामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तनाचा प्रारंभ झाला आहे. जातीचा दाखला हा केवळ कागद नसून त्यांच्या प्रगतीचे चिन्ह आहे. या दाखल्यांच्या माध्यमातून भटक्या समाजातील नागरिकांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या आशेचा किरण आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले वितरण व पाणंद रस्ते खुले केल्याप्रकरणी कृतज्ञता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी अजय पवार, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, राजीव शिंदे आणि विवेक काळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

जातीचे दाखले व पाणंद रस्ते अभियानात केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे व महसूल प्रशासनाचे अभिनंदन करुन अप्पर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, जातीच्या दाखल्यांचा लाभ घेऊन भटक्या समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण व उच्च शिक्षण घ्यावे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती साधावी. पालकांनीही त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण तसेच आदरातिथ्य, परिचारिका आदि व्यवसायाभिमुख शिक्षण, प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी श्री. खारगे यांनी ते तत्कालिन औरंगाबादचे जिल्हाधिकारी असताना नागपंथी डवरी समाजाच्या व अन्य भटक्या समाजाच्या प्रगतीच्या अनुषंगाने जातीच्या दाखल्यांची गरज ओळखून त्यांना शिक्षण, जमीन व स्थिरसावर करण्याच्या दृष्टीने केलेल्या कामकाजाची माहिती देऊन, या कामातून आत्मिक समाधान लाभल्याचे सांगितले.

लाभ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, पाणंद रस्ते खुले झाल्याने सदरच्या रस्त्यावरून वाहतूक होण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. शेतात वाहने व अवजारे नेण्यास रस्ते उपयुक्त झाले आहेत. अन्नधान्य विक्रीसाठी वाहतूक करण्याच्या दृष्टीने तसेच, उद्योग व्यवसाय वाढीसाठी मदत झाली आहे. आता पुढील टप्प्यात हे रस्ते नकाशावर येण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांचे चिन्हांकन करून नकाशात नोंद घेण्यासाठी प्रयत्न करावेत. पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

विविध विभागात काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी आपण वेगवेगळ्या पद्धतीने जोडले गेल्याबद्दल अभिमान व्यक्त करून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी छत्रपती शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांच्या जागतिक वारसास्थळ म्हणून घेतली गेलेली नोंद, वाघनखे परत आणण्याच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त आखलेले उपक्रम आणि आता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत असलेली कार्यवाही यांचा प्रामुख्याने उल्लेख त्यांनी केला.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जातीच्या दाखल्यांच्या माध्यमातून शासनाने भटक्या समाजातील नागरिकांच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग आणला आहे. याची मदत घेऊन शिक्षण घ्यावे व आयुष्यात प्रगती साधावी. तुम्ही कष्टकरी आहात. व्यक्ति म्हणून, कुटुंब म्हणून, समाजाच्या प्रगतीत व राष्ट्रबांधणीत योगदान देण्याच्या कामाला सुरवात करावी. तसेच, पाणंद रस्त्यांमुळे गावकऱ्यांचे स्वप्न सत्यात येणार आहे. या रस्त्यांचे रक्षण करा. त्यासाठी ग्रामपंचायत, तंटामुक्त समितीची मदत घ्यावी. एकमेकांच्या मदतीने, सहकार्याने आपले आयुष्य उजळून टाकावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वडाच्या रोपास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी तहसील कार्यालय शिराळा यांनी तयार केलेले महसूल नवोपक्रम समावेशी सुगमतेचा ध्यास आणि तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ यांनी तयार केलेली अविरत महसूल तसेच तासगाव तालुका महसूल सप्ताह अंतर्गत अतिक्रमित पाणंद रस्ते खुले केलेल्या माहिती पुस्तिकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पाणंद रस्ते खुले झाल्यामुळे लाभार्थी विनोद गायकवाड (आरग ता. मिरज), एकनाथ चव्हाण ( विठूरायाचीवाडी ता. कवठेमहांकाळ) आणि अरविंद पाटील (अंजनी ता. तासगाव) यांनी तसेच जातीचे दाखले मिळालेले सूरज पवार आणि आबा कांबळे (सांगली) तसेच श्रीमंत पांढरे (टाकळी, ता. मिरज) यांनी या मनोगतात महसूल विभागाकडून आलेले सकारात्मक अनुभव कथन केले. सूत्रसंचालन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले.

यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथील 20 व मिरज तालुक्यातील टाकळी गावातील 10, अप्पर सांगली तहसील कार्यालयांतर्गत 10 लाभार्थींना नंदीवाले समाजाचे, मिरज तालुक्यातील टाकळी गावातील 10, अप्पर सांगली तहसील कार्यालयांतर्गत 10 लाभार्थींना बेरड/रामोशी समाजाचे तासगांव तालुक्यातील तासगांव व विसापूर गावातील प्रत्येकी 10 लाभार्थ्यांना नाथपंथी डवरी, गोसावी व रामोशी समाजाचे दाखले वितरित करण्यात आले. अप्पर सांगली तहसील कार्यालयांतर्गत 20 लाभार्थींना वडर, 20 लाभार्थींना माकडवाडे, 16 लाभार्थींना मांग गारुडी, बुधगाव येथील 12 लाभार्थींना गोसावी आणि सांगली येथील 10 लाभार्थींना मुस्लीम (ओबीसी) समाजाचे दाखले वितरित करण्यात आले. माधवनगर आणि लिंगनूर येथील कडकलक्ष्मी, बेरड गोसावी आणि रामोशी समाजातील 45 लाभार्थ्यींना दाखले वाटप करण्यात आले. यावेळी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील अडीच किलोमीटर रस्ता 35 वर्षांपासून अडविलेला होता. हा रस्ता खुला झाल्याने 45 नागरिकांना लाभ झाला आहे. शेती बागायती होण्यास मदत होणार आहे. मिरज तालुक्यातील आरग येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील 3 किलोमीटर रस्ता मागील 5 महिन्यापासून अडविला होता. हा रस्ता खुला झाल्याने गावातील सर्व 250 नागरिकांना लाभ झाला आहे. तासगाव तालुक्यातील अंजनी येथील रस्ता 2.5 कि.मी. 30 वर्षापासून अडविला होता. हा रस्ता खुला झाल्याने 175 नागरिकांना लाभ झाला आहे. मिरज तालुक्यातील सलगरे येथे सर्व रस्त्यावरील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. प्रांताधिकारी/ तहसिलदार, सरपंच यांनी 100 दिवसात सभा घेऊन सामंजस्यातून संमतीने 1 कि.मी. रस्ता खुला केला. हा रस्ता खुला झाल्याने 400 नागरिकांना लाभ झाला आहे.

यावेळी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांना भेट देऊन पाहणी केली. क्यू आर कोडद्वारे सेवा उपलब्ध केल्याची पाहणी केली.

 

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा,रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

अ.भा. लोकहित महासंघाची स्थापना

वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश….

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन