नवकल्पना, उद्योगसंधी आणि युवा अभियंत्यांच्या भविष्यावर मंथन-रोटरी क्लब ऑफ जालना एलिटतर्फे अभियांत्रिकी दिन उत्साहात; अभियंता सदस्यांचा विशेष गौरव
जालना (प्रतिनिधी) : अभियांत्रिकी क्षेत्रातील नव्या संकल्पना, उद्योगक्षेत्रातील बदलत्या संधी आणि युवा अभियंत्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा विशेष कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ जालना एलिटतर्फे आयसीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, जालना येथे उत्साहात पार पडला. आजची नवकल्पना, उद्याचे उज्ज्वल भविष्य या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अभियंते, विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि रोटरी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. अपरिहार्य कारणांमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत उपक्रमाला पाठिंबा व्यक्त केला. कार्यक्रमास आयसीटीचे संचालक प्रा. डॉ. शशांक म्हास्के, सीएमआयएचे उपाध्यक्ष अभियंता मिहिर सौंदलगीकर तसेच उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक अभियंता सुनील रायथट्ठा यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. डॉ. शशांक म्हास्के यांनी अभियांत्रिकी शिक्षणातील बदल, तंत्रज्ञानातील नव्या दिशा आणि भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभियंता मिहिर सौंदलगीकर यांनी उद्योगक्षेत्रातील बदलत्या संधी आणि अभियांत्रिकीच्या भविष्यातील भूमिकेवर विचार मांडले. अभियंता सुनील रायथट्ठा यांनी विद्यार्थ्यांना नव्या कल्पनांना चालना देत भविष्यासाठी स्वतःला सक्षम करण्याचे आवाहन केले
यावेळी आयसीटीचे माजी विद्यार्थी आशिष मंत्री यांनी उद्योग क्षेत्राशी विद्यार्थ्यांचा थेट संपर्क वाढविण्यासाठी प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. अशा संधींमुळे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून व्यावसायिक क्षेत्रासाठी अधिक चांगली तयारी करता येईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ जालना एलिटमधील अभियंता सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व्यावसायिक क्षेत्रात योगदान देतानाच रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या अभियंत्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. व्यावसायिक कौशल्यासोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सदस्यांचा सन्मान हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा अभियंता अनया अग्रवाल यांनी स्वागत व प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. अभियांत्रिकी हे केवळ व्यवसायाचे साधन नसून ज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणसंस्था, उद्योग आणि रोटरी यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगानुभवाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर यावेळी भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ जालना एलिटचे सचिव गणेश बाळे, सर्व रोटरी सदस्य तसेच आयसीटी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा उपक्रम युवा अभियंत्यांना उद्योगविश्वाशी जोडणारा, नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा आणि व्यावसायिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला