आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा वापर वाढवा – कवी डॉ. हबीब भंडारे
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : मराठी ही आपल्या विचारांचा, भावनांचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा आधार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आपली जबाबदारी अधिक वाढली असून दैनंदिन व्यवहार, शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा अधिकाधिक वापर करावा, असे प्रतिपादन कवी डॉ. हबीब भंडारे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व भाषा संचालनालय, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘मराठी भाषा सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ. भंडारे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
डॉ. भंडारे म्हणाले की, ताम्रपट, शिलालेख आणि ‘गाथासप्तशती’पासून मराठी भाषेची प्राचीन व समृद्ध परंपरा दिसून येते. यादव काळात मराठीचा राज्यव्यवहारात वापर झाला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही मराठीला राज्यकारभारात महत्त्वाचे स्थान मिळाले. संत साहित्याने मराठीचा सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा अधिक समृद्ध केला.
मातृभाषा ही भावनिक आणि वैचारिक विकासाचे प्रभावी माध्यम आहे. उच्च व तांत्रिक शिक्षणातही मराठीचा वापर वाढला पाहिजे. मराठीतील दर्जेदार साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित व्हावे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विविध डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा वापर वाढवावा. स्वतःची स्वाक्षरी मराठीत करण्यापासूनही याची सुरुवात करता येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात विभागीय संचालक बाबासाहेब जगताप यांनी सांगितले की, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मराठीच्या हजारो वर्षांच्या साहित्यिक, सांस्कृतिक व भाषिक परंपरेचा गौरव आहे. यासाठी रंगनाथ पठारे, हरी नरके यांच्यासह अनेक संशोधक व साहित्यिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभिजात दर्जानंतर मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि व्यवहारातील वापर वाढविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.