
जिल्ह्यात कुष्ठरोग सर्वेक्षण व लक्षित कुष्ठरोग शोध अभियान;संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्वरित उपचार करावे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया
जालना, प्रतिनिधी : जिल्ह्यात कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी सुरू असलेल्या कुष्ठरोग सर्वेक्षण व लक्षित कुष्ठरोग शोध अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया यांनी दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित समित्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली
जिल्ह्यात 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कुष्ठरोग सर्वेक्षण व लक्षित कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कुष्ठरोगाचे रुग्ण प्रारंभिक अवस्थेत शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणणे, तसेच शासनाने निर्धारित केलेले शून्य कुष्ठरोग प्रसाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यात संसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घराजवळील, शेजारील तसेच कामाच्या ठिकाणाजवळील परिसरातील आणि आजूबाजूच्या 300 घरांचे गुणवत्तापूर्ण सर्वेक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे. कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या सहवासात असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधाची एक मात्रा (पीईपी) देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.
कुष्ठरोगाची पुढील प्रमुख लक्षणे असुन, यामध्ये, त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टे पडणे व त्या ठिकाणी घाम न येणे. त्वचा जाड, बधिर किंवा तेलकट दिसणे. त्वचेवर गाठी येणे आणि कानाच्या पाळ्या जाड होणे. हातापायांची बोटे वाकडी होणे, मुंग्या येणे किंवा बधिरता जाणवणे. भुवयांचे केस विरळ होणे किंवा डोळे पूर्ण बंद करता न येणे. त्वचेवर थंड व गरम संवेदना जाणवत नसणे हे लक्षणे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. कुष्ठरोगाचे लवकर निदान व नियमित उपचार केल्यास विकृती टाळण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
****



