
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जालना लोकसभा मतदारसंघातील2061 मतदान केंद्रावर पथके रवाना
जालना, प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सोमवार दि.13 मे 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून जालना लोकसभा मतदारसंघात पुरुष 10 लाख 34 हजार 106 तर स्त्रीया 9 लाख 33 हजार 416 व इतर 52 अशी एकुण 19 लाख 67 हजार 574 मतदारांची संख्या आहे. तरी जिल्ह्यातील सर्व 2 हजार 61 मतदार केंद्रावर मतदान पथके रविवार दि. 12 मे रोजी रवाना झाली आहेत.
जालना लोकसभा मतदार संघात सोमवार दि.13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जालना लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यात जालना जिल्ह्यातील 101 जालना विधानसभा मतदार संघातील सर्व 329 मतदान केंद्र पथके, पोलीस कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्राकडे रवाना झाली. 102-बदनापूर विधानसभा मतदार संघाअंतर्गत असलेले मतदान केंद्र 358 मतदान केंद्राचे कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचले आहेत. 103- भोकरदन या विधानसभा मतदार संघाअंतर्गत सर्व 329 मतदान केंद्र पथके पोलीस कर्मचाऱ्यासह मतदान केंद्राकडे पोहचले.
जालना लोकसभा मतदार संघातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 104-सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 356 मतदान केंद्रावर सर्व मतदान पथके आज रवाना झाली. 110- पैठण विधानसभा मतदार संघातील सर्व 334 मतदान केंद्राची पथके आज नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत. 106-फुलंब्री विधानसभा मतदार संघाअंतर्गत सर्व 355 मतदान केंद्रावर आज दुपारनंतर रवाना झाली असून सुरक्षितरित्या मतदान केंद्रावर पोहचली आहेत.
जालना जिल्ह्यातील 2061 मतदान केंद्रासाठी ईव्हीएम यंत्र व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना वितरीत करण्यात आले असून मतदान पथके उत्साहात मतदान केंद्राकडे रवाना झाली आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातील 2061 मतदान केंद्रापैकी 1036 मतदान केंद्राचे वेबकास्टींग करण्यात येणार असून या 1036 केंद्रावर सीसीटीव्हीची कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत वापरात येणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली लावण्यात आली असून जिल्ह्यात विविध प्रकारातील वाहने यामध्ये जीप 405, क्रुझर-324, मिनी बसेस 25, बस 216 आणि बंद कंन्टेनर 24 अशी वापरात आणली जात आहेत.
मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्षपातीपणे आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपला मतदानाचा अमुल्य हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.



