vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी

नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- महापालिका सर्वसाधारण सभेत पावसाळापूर्व कामांविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आयुक्त महोदयांनी नाले व गटार सफाईची पहाणी केली होती. त्यामध्ये 60 ते 80 टक्के कामे पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता व 15 मे पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यास अनुसरुन आज नालेसफाई व होल्डिंग पाँडची पाहणी केली असून प्रशासनाने समाधानकारक काम केले असल्याचे निदर्शनास येत असून या पावसाळयात नागरिकांना त्रास होणार नाही असा विश्वास वाटतो असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी, पावसाळापूर्व केलेली कामे तेव्हाच यशस्वी मानता येतील जेव्हा पावसाळयात नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही असे मत व्यक्त केले. मार्गील वर्षी 15 मे पासून पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र पाऊस काहीसा उशिरा येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या अनुषंगाने ही सुरु असलेली कामे अशीच गतीमानतेने सुरु ठेवावीत असे आदेशित करत भर पावसात पुन्हा पाहणी दौरा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

          आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सुरुवात करत नैसर्गिक नालेसफाई कामांची तसेच विशेषत्वाने होल्डिंग पाँड स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपमहापौर श्री. दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ तसेच आपापल्या विभागांमध्ये तेथील स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संजय शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व इतर अधिकारी या दौ-याप्रसंगी उपस्थित होते.

          दिघा येथील ग्रीन वर्ल्ड जवळील नाल्यामधून एमसीडीसीएलच्या मोठया वायर्स जात असल्याने नाल्यात नागरिकांमार्फत टाकला जाणार कचरा अडकून राहतो. ही परिस्थिती अनेक ठिकाणी निदर्शनास येते, त्यामुळे या वायर्स एकत्रितपणे वरच्या बाजूला बांधून ठेवाव्यात जेणेकरुन प्रवाहातील वाहते पाणी अडणार नाही व रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महापौर महोदयांनी दिले. या स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनीही प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या अथवा कचरा न टाकण्याची दक्षता घ्यावी जेणेकरुन ते पुन्हा अस्वच्छ होणार नाही असे आवाहनही महापौरांनी केले.

          काही ठिकाणी उद्योगसमुहांच्या बाजूने वाहत असलेल्या नाल्यांमध्ये कंपनीच्या बाजूने कचरा टाकला जातो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी उद्योग समूहांसोबत समन्वय साधण्याचेही महापौरांनी निदर्शित केले.

          दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर अशा विविध क्षेत्रांमधील नाले सफाईची पाहणी करण्यासोबतच होल्डिंग पाँड क्षेत्रांचीही महापौरांनी पाहणी केली.

          होल्डिंग पाँडमध्ये 70 ते 80 टक्के गाळ भरलेला असून खारफुटीमुळे गाळ काढण्यास परवानगी मिळत नाही. याबाबत वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्यामार्फत परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरच यश येईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. तोपर्यंत होल्डिंग पाँडच्या जेवढ्या भागाची परवानगी आहे तेथील गाळ काढणे सुरु असून होल्डिंग पाँडच्या ठिकाणी जास्त क्षमतेचे पाणी उपसा पंप बसवले जात आहेत. जेणेकरुन अतिवृष्टी काळात होल्डिंग पाँडमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी उपसून खाडी भागात टाकण्यात येईल. होल्डिंग पाँड हे नवी मुंबई शहराचे सुरक्षा कवच असून ते संरक्षित राखण्यासाठी गतीमान पावले उचलण्यात येत आहेत असेही महापौरांनी सांगितले.

          नवी मुंबई क्षेत्रात काही सखल भाग असून भरती आणि अतिवृष्टी एकाचवेळी आल्यास त्या भागात काही प्रमाणात पाणी साचते. अशा ठिकाणी अधिकच्या पाणी उपसा पंपांची आधीच सोय करुन ठेवावी असे निर्देश महापौर महोदयांनी दिले. पावसाळी कालावधीत सर्व विभाग कार्यालये तसेच मुख्यालय या ठिकाणी 24 X 7 हेल्पलाईन कार्यान्वित असेल व आपत्त्कालीन मदत कक्ष सुरु राहील याची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असेही महापौरांमार्फत निदर्शित करण्यात आले.

          दिघ्यापासून सुरु झालेल्या या पाहणी दौ-यात श्रीम.चांदणी चौगुले, श्रीम.गौरी आंग्रे, श्रीम.सायली शिंदे, श्रीम.दिव्या गायकवाड, श्रीम.प्रणाली लाड, श्रीम.सोनवी लाड, डॉ.प्रणाली पाटील, श्री.भाऊ भापकर, श्री.सुनिल कुरकुटे, श्रीम.शुभांगी पाटील, श्रीम.शशिकला पाटील, श्रीम.कविता पाटील, श्रीम.सलुजा सुतार, श्री.अमित मेढकर आदी पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका आपापल्या क्षेत्रामध्ये उपस्थित होते.

          एकंदरीतच नवी मुंबईतील नाले सफाई कामांची पाहणी केल्यानंतर समाधानकारक काम झाले असल्याचे दिसून येत असून या कामाचा वेग असाच सुरु ठेवावा व नवी मुंबईकर नागरिकांना पावसाळयात पाणी भरणार नाही असा दिलासा देणारे काम करावे असे निर्देश देत नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी पावसाळी कालावधीतही नागरिकांच्या अडी – अडचणीत तत्पर मदतकार्य पुरविण्यासाठी 24 X 7 आपत्कालीन कक्ष कार्यरत ठेवावेत असे आदेशीत केले.

0000

संबंधित पोस्ट

आर टी ई शाळांचे चालक आंदोलनाच्या पावित्र्यात…

vishwatmaklokswamivarta

मच्छीमारांनो सावधान..!*१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई*

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायामशाळेचे लोकार्पण रुग्णांची देखभाल करतांना स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवा- पालकमंत्री शिरसाट

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मच्छिमारांना ५ सॅटेलाईट फोनचे वितरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली पाहणी

महसूल प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करा;योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे