vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विशेष वृत्त-कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण तातडीने करा : प्रशासनाचे आवाहन

विशेष वृत्त-कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण तातडीने करा : प्रशासनाचे आवाहन

जालना जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 505पात्र शेतकरी; अद्याप 78 हजार 215 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी..

जालना, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि दि. 31 मार्च 2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाची मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्यातील सर्व बँकांनी एकूण 2 लाख 3 हजार 283 थकबाकीदार खातेदारांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. या माहितीच्या आधारे दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाभार्थी यादीमध्ये जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 505 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र, या पात्र लाभार्थ्यांपैकी दि. 29 जुलै 2026 पर्यंत केवळ 29 हजार 290 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, अजूनही 78 हजार 215 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड व लाभार्थी यादीतील विशिष्ट क्रमांक सोबत न्यावा. केंद्रावर विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्याची माहिती आणि थकीत कर्जाची रक्कम दिसून येईल. सदर रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शवून आधार प्रमाणीकरण करावे. जर रक्कमेबाबत शंका अथवा आक्षेप असल्यास असहमती नोंदवूनही आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी असहमती नोंदवल्यानंतर संबंधित तक्रार ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या अभिलेखांच्या आधारे तक्रारीची शहानिशा करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल आणि सुधारित माहिती पुन्हा पोर्टलवर अपलोड केली जाईल. याशिवाय, आधार प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकास कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा संभ्रमाला बळी न पडता पात्र शेतकऱ्यांनी विनाशुल्क आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीची कार्यवाही पूर्ण होऊन त्यांना भविष्यात नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्गही सुकर होणार आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना श्री. रोडगे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम- महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार..

vishwatmaklokswamivarta

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरतीसाठी1 ते 8 जुलै कालावधीत ऑनलाईन परीक्षा..

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू