vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संपर्क, संवाद आणि समाधान या त्रिसूत्रीतून नागरिकांना तत्पर सेवा द्या — विभागीय आयुक्त जी.श्रीकांतमहसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी व गुणवंत पाल्यांचा गौरव

‘संपर्क, संवाद आणि समाधान या त्रिसूत्रीतून नागरिकांना तत्पर सेवा द्या — विभागीय आयुक्त जी.श्रीकांतमहसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी व गुणवंत पाल्यांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: बदलत्या काळात नागरिकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षाही बदलत आहेत. आजच्या पिढीला शासकीय सेवा जलद, सुलभ आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने पारंपरिक कार्यपद्धतीत आवश्यक बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. ‘संपर्क, संवाद आणि समाधान’ या त्रिसूत्रीच्या आधारे नागरिकांना तत्पर आणि लोकाभिमुख सेवा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आज येथे केले.

महसूल दिनानिमित्त महात्मा गांधी मिशन महाविद्यालयातील रुख्मिणी सभागृहात आयोजित अधिकारी-कर्मचारी गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव यांच्यासह अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त म्हणाले की, महसूल विभाग हा शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असून शासन आणि सर्वसामान्य नागरिकांना जोडणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. शासनासमोर कोणतेही मोठे आव्हान अथवा महत्त्वाची जबाबदारी आली की महसूल प्रशासनाची भूमिका अग्रस्थानी असते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदारीचे महत्त्व ओळखून नागरिककेंद्री दृष्टिकोनातून काम करणे आवश्यक आहे.

 

आजची नवी पिढी वेग, तत्परता आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देते. नागरिकांना शासकीय सेवा घेण्यासाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज भासू नये. शक्य तितक्या सेवा नागरिकांना त्यांच्या घराजवळ किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करावी. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्ष सेवेत उतरली पाहिजे. खासगी क्षेत्रातील अनेक सेवा घरपोच मिळत असताना शासकीय सेवाही अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

 

केवळ स्मार्टफोनचा वापर म्हणजे स्मार्ट प्रशासन नव्हे, तर नागरिकांना सेवा किती सुलभ, जलद आणि स्मार्ट पद्धतीने देता येतात, यावर प्रशासनाची कार्यक्षमता ठरते. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रत्येकाने आपल्या कार्यपद्धतीत आवश्यक बदल करावा. बदलत्या काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल केला नाही, तर बदलती व्यवस्था आपल्याला बदलण्यास भाग पाडेल, असेही त्यांनी सांगितले.

‘संपर्क, संवाद आणि समाधान’ ही प्रशासनासाठी महत्त्वाची त्रिसूत्री आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, सकारात्मक संवाद साधावा आणि त्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्यावर भर द्यावा. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवांसाठी आंदोलन अथवा उपोषण करण्याची वेळ येऊ नये. नियमानुसार मिळणाऱ्या सेवा अनावश्यक पाठपुरावा न करता वेळेत मिळाल्या पाहिजेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या पदामुळे नव्हे, तर कामातून निर्माण झाला पाहिजे. निवृत्तीनंतरही नागरिकांनी आदराने आठवण काढावी, असे काम प्रत्येकाने करावे. जमिनीशी जोडलेले राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले की, नागरिकांसाठी शासन म्हणजे कोणताही एक विभाग नसून संपूर्ण प्रशासन असते. नागरिकांचा प्रश्न महसूल, कृषी, पोलीस किंवा अन्य कोणत्या विभागाशी संबंधित आहे, यापेक्षा त्यांचे काम वेळेत होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विभागांच्या कार्यकक्षेचे कारण देत जबाबदारी एकमेकांकडे ढकलण्याऐवजी ‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ दृष्टिकोनातून सर्व विभागांनी परस्पर समन्वय आणि प्रभावी संवादातून काम करावे.

 

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR), आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया, अतिक्रमण नियमानुकूल करणे अथवा हटविणे तसेच जमीनविषयक कामे एका विभागापुरती मर्यादित नसतात. अनेक विभागांच्या समन्वयातून ही कामे पूर्ण होतात. त्यामुळे वरिष्ठ स्तरापासून क्षेत्रीय स्तरापर्यंत समन्वयाची कार्यसंस्कृती अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्तम क्षमता आणि कार्यकुशलता आहे. सर्वांनी लोकाभिमुख दृष्टिकोनातून एकत्रितपणे काम केल्यास छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अग्रस्थानी येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी व्यक्त केला.

 

पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले की, आपत्तीची परिस्थिती असो, पंचनामे व मदत वाटप असो, पीक कर्जमाफीची अंमलबजावणी असो किंवा शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना व प्रकल्प असोत; प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून काम करणारी यंत्रणा म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. त्यामुळे नागरिकांसह संपूर्ण प्रशासनाचा महसूल यंत्रणेवर दृढ विश्वास आहे.

महसूल विभागाचे काम नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची क्षमता या विभागात आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी अभिनंदन केले. शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची, कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाचीही काळजी घ्यावी. महसूल संघटना आणि कल्याण समित्यांच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबवावेत, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

 

महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, महसूल प्रशासन हा शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असून शासनाच्या विविध योजना, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या कामांमध्ये महसूल यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावते. विविध विभागांतील परस्पर सहकार्य, समन्वय आणि लोककल्याणाची भावना कायम ठेवून अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी महसूल दिनानिमित्त सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. महसूल प्रशासनाशी आपले विशेष नाते असून यापूर्वी उपविभागीय अधिकारी म्हणून महसूल दिन साजरा करण्याची संधी मिळाली होती. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महसूल विभाग आणि जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांचा ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संबंध आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रीय यंत्रणेशी समन्वय राखून काम केल्यास नागरिकांची कामे अधिक जलद आणि प्रभावीपणे मार्गी लागतील. प्रशासकीय कामाचा व्याप सांभाळताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी केले.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव यांनी महसूल दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत महसूल प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. कायदा व सुव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये पोलीस आणि महसूल प्रशासनाचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. क्षेत्रीय स्तरावर दोन्ही यंत्रणांनी परस्पर संवाद, समन्वय आणि सहकार्य अधिक मजबूत केल्यास नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविता येतील, असे त्यांनी सांगितले.

 

नागरिकांशी थेट संपर्क ठेवून शासनाच्या विविध योजना आणि सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात महसूल विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपत्ती तसेच अन्य आव्हानात्मक परिस्थितीत महसूल आणि पोलीस यंत्रणा समन्वयाने काम करतात. ही समन्वयाची परंपरा अधिक मजबूत करून नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.

 

सेवानिवृत्त अधिकारी व गुणवंत पाल्यांचा गौरव

महसूल विभागातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, डॉ. भारत कदम आणि राजेश काटकर यांचा त्यांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचाही गौरव करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले.उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी संवर्गात संभाजी अडगुणे, उपजिल्हाधिकारी संवर्गात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी व उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ बंगाळे, तहसीलदार संवर्गात छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार शिवानंद बिडवे आणि सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने यांचा सत्कार करण्यात आला.

नायब तहसीलदार संभाजी देशमुख, अनिता खुणे, लघुलेखक दत्तात्रय आटुळे, सहायक महसूल अधिकारी संवर्गातील दिनेश हापत, राजू देवळे, आकाश आरमाळ, गोपीनाथ जैवळ, सतीश पेंडसे आणि गजानन चिपडे यांचाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. तसेच मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक, वाहनचालक, शिपाई, महसूल सेवक आणि पोलीस पाटील आदी विविध संवर्गांतील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

विशेष लेख-स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव…

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta