vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना, अभिप्राय देण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन*तक्रारी स्विकारण्यासाठी आठ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष*

*भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना, अभिप्राय देण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन*तक्रारी स्विकारण्यासाठी आठ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष*

 

*छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांतील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सूचना व अभिप्राय द्यावेत, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासह गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीचे सदस्य २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेट देणार आहेत. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था व संबंधित घटकांशी चर्चा करून परीक्षा पद्धतीतील सुधारणा, अडचणी व उपाययोजनांबाबत सूचना व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.

या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड व हिंगोली या आठ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी हे या प्रक्रियेचे नोडल अधिकारी राहणार आहेत. विशेष कक्षात नागरिकांना आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने प्रत्यक्ष सादर करता येतील.विशेष कक्ष १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपले लेखी अभिप्राय विहित मुदतीत csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत.

भरती परीक्षा पद्धती अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विद्यमान परीक्षा प्रणालीचा आढावा, विविध शासकीय विभाग, प्राधिकरणे व परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या सध्याच्या परीक्षा पद्धती व कार्यपद्धतीबाबतही सूचना मागविण्यात आल्या आहेत. परीक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांनी आपले मत मांडावे.

प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल जाहीर होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेचे मुद्रण, डिजिटल अथवा मुद्रित स्वरूपातील वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षितता याबाबतही अभिप्राय अपेक्षित आहेत. डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, लेखापरीक्षण नोंदी व सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबतही सूचना देता येणार आहेत.

पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना व उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत सुविधा, सुरक्षितता, मनुष्यबळ व कार्यक्षमतेची मानके निश्चित करण्याबाबतही अभिप्राय देता येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग व परीक्षा संस्था यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्याबाबत तसेच उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था उभारण्याबाबतही सूचना अपेक्षित आहेत. इतर राज्ये व देशांतील यशस्वी, आधुनिक व सुरक्षित परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून त्यातील उत्कृष्ट पद्धती राज्यात लागू करण्याबाबतही नागरिक आपले मत मांडू शकतात.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या सूचनांचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.

राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व नागरिक, विद्यार्थी, परीक्षार्थी, अभ्यासक व संबंधित संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भरती परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आपल्या सूचना व अभिप्राय द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*****

संबंधित पोस्ट

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिल्लीच्या मराठी संमेलनाविरोधात विद्रोहीचा आवाज घुमणार छ.संभाजीनगरातअध्यक्ष,उद्घाटक व तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका जाहीर !

vishwatmaklokswamivarta

नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे आज 2 मार्चला उद्घाटन